पुण्यातल्या नाट्यसृष्टीचे माहेरघर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आहे. या नाट्यगृहांमध्ये नाटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक कलाकारांना नाट्यप्रयोग करणे फार कठीण जात आहे. अनेक कलाकार याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने एक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर आता एका प्रसिद्ध गायकाने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर हे फेसबुकवर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी बालगंधर्व नाट्यगृहाबद्दल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी बालगंधर्व नाट्यगृहासमोर एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी बालगंधर्व पाडण्याची खरंच गरज आहे का? त्यापेक्षा कलाकारांना नाट्यगृहात वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवता येईल?, याकडे लक्ष द्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे.




“जर आलिया भट्ट…, ‘रानबाजार’मधील बोल्ड सीनवर प्राजक्ता माळीच्या आईने दिली अशी प्रतिक्रिया
मंगेश बोरगावकरांची फेसबुक पोस्ट
“परवा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे कार्यक्रम झाला तेव्हा “तुमचा हा इथला शेवटचा कार्यक्रम” अस सांगण्यात आलं. सुरुवातीला कोणीतरी मज़ा करतंय अस वाटलं..पण दुर्दैवाने हे खरयं कळल्यापासुन मात्र त्रास होतोय.. पार्किंग मधील झाडे ही तोडलेली दिसली..खरचं याची गरज आहे का!??
कोविड नंतर आता कुठे आपण सावरतोय..याऊलट सर्व नाट्यगृहांमधील सुविधा कश्या उत्तम करता येतील याकडे ज़र लक्ष दिलं गेलं तर उत्तम होईल अस एक कलाकार व रसिक म्हणुन मनापासुन वाटतं…आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल…”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान विशाखा सुभेदार हिनेही याबाबत एक पोस्ट शेअर करत भाष्य केले होते. विशाखा सुभेदार हिने नुकतंच फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. “बालगंधर्व.. जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो. मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणारंच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत…? बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते, असे तिने म्हटले होते.