प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडियन आणि आम आदमी पक्षाचा ( आप ) कार्यकर्ता ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून हॉटेलमध्ये २५ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानसरोवर पोलिसांनी ख्याली सहारनवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर येथील एक महिला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण, नोकरीची गरज असल्याने दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून ही महिला कॉमेडियनच्या संपर्कात आली.
हेही वाचा : “कंगना रणौतचे चित्रपट बघता का?” कौतुकाचा वर्षाव करत संजय राऊत म्हणाले, “ती एक…”
सोमवारी ख्यालीने महिलेला हॉटेलमध्ये बोलवले. तेव्हा ख्यालीने हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या होत्या. त्यानंतर ख्यालीने मद्याचे सेवन करत महिलांनाही जबरदस्तीने पिण्यास सांगितलं. मद्याचे सेवन केल्यावर त्यातील एक महिला रूममधून निघून गेली. तेव्हा ख्यालीने दुसऱ्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला.
ही घटना घडल्यावर महिलेने मंगळवारी कॉमेडियनविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, ख्यालीवर आयपीसी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मानसरोवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप यादव यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणावर आपने भाष्य केलं आहे. आपचे प्रवक्ता योगेंद्र गुप्ता यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “आपचे लाखो कार्यकर्ते आहेत. त्यातील ख्याली एक आहे. ख्याली स्वत:च्या आयुष्यात काय करतो, याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.”