Samantha Ruth Prabhu Temple: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जिची क्रेझ बॉलीवूडमध्ये खूप असते ती म्हणजे समांथा रूथ प्रभू. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे समांथाची चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपूर्वी २८ एप्रिलला समांथाने ३८वा जन्मदिवस साजरा केला. समांथाच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये समांथाचा जबरा फॅन पाहायला मिळाला.

समांथा रुथ प्रभूच्या या जबरा फॅनने तिच्या वाढदिवसानिमित्ताने मंदिर बांधलं. या मंदिरात या चाहत्याने समांथाचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ एक्सवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच ‘समांथाचं मंदिर’ असं लिहिलेलं आणि फुलांनी सजवलेलं फलक दिसत आहे. त्यानंतर समांथाचे दोन पुतळे पाहायला मिळत आहेत. मंदिरात एक सोनेरी रंगाचा पुतळा आहे. तर दुसरा लाल रंगाच्या साडीतला समांथाचा पुतळा दिसत आहे. त्यानंतर चाहता अनाथ मुलांबरोबर केक कापून समांथाचा वाढदिवस साजरा करत आहे. सर्व मुलं देखील समांथाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.

समांथाचं मंदिर उभं करणाऱ्या चाहत्याचं नाव तेनाली संदीप आहे. माध्यमांशी संवाद साधताना तेनाली म्हणाला, “मी आंध्र प्रदेशमधला आहे. मी समांथाचा खूप मोठा चाहता आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मी काही वर्षांपूर्वीचं हे मंदिर बांधलं होतं. मी दरवर्षी समांथाचा वाढदिवस मुलांबरोबर साजरा करतो. त्यांच्याबरोबर केक कापून त्यांना जेवायला देतो. समांथाने मला खूप प्रेरणा दिली आहे.”

दरम्यान, समांथा रुथ प्रभूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी ती ‘सिटाडेल हनी बनी’ वेब सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. तसंच ती आता ‘रक्त ब्रह्मांड’ नावाची सीरिज करत आहे. तसंच निर्माती म्हणून समांथाचा एक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, समांथाचं नाव लोकप्रिय दिग्दर्शक राज निदिमोरू बरोबर जोडलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.