मोठ्या कलाकारांना आपल्या इशा-यावर नाचवणारी बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खानने करिअर घडविण्यात तिला दिलेल्या प्रोत्साहनासाठी आई वडिलांचे आभार मानले आहेत. परंतु, चित्रपट क्षेत्रात न येता २१ व्या वर्षीच लग्न करून गृहिणी बनण्याचे स्वप्न ती पाहात होती, असेही तिने यावेळी सांगितले.
फराहने कोरिओग्राफी केलेली अनेक गाणी हिट  झाली आहेत. ‘पहला नशा’, ‘इक पल का जीना’, ‘इधर चला मैं उधर चला’, ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘शीला की जवानी’, ‘अनारकली डिस्को चली’, ‘फेवीकोल’ सारख्या गाण्यांवर प्रसिद्ध चित्रपट कलाकारांना फराहने आपल्या इशा-यावर नाचवले आहे. याशिवाय २००७ मध्ये ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे तिने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मगील वर्षी आलेल्या ‘शिरीं फरहाद की तो निकल पड़ी’ या चित्रपटात तिने अभिनय सुद्धा केला होता. अनेक डान्स आणि रियालिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावलेली फराह खान या वेळच्या ‘डान्स इंडिया डान्स – सुपर मॉम्स’ रियालिटी शोची परीक्षक आहे.
फराह म्हणाली, ‘डान्स इंडिया डान्स – सुपर मॉम्स’ रियालिटी शोमधील सुंदर मम्मिंना स्क्रिनवर पाहिल्यावर मला असे वाटते की जर मी बॉलिवूडमध्ये आले नसते, तर २० व्या वर्षीच लग्न करून  यशस्वी कौटुंबिक जीवन जगत असते आणि त्याच वेळी मी मुलांची आई देखील झाले असते.
आई वडिलांनी करिअर बनविण्यात दिलेल्या प्रोत्साहनासाठी फराह आपल्या आई वडिलांचे आभार मानते आणि त्यामुळेच यशाच्या शिखरापर्यंत येऊन पोहचल्याचे सांगण्यास ती विसरत नाही.