गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबीयांना रियावर अनेक आरोप केले आहेत. तसंच सीबीआय तपासातदेखील रिया आणि सुशांत यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेकांनी रियाला ट्रोल केलं आहे. मात्र, आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी विद्या बालन, तापसी पन्नू या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता अभिनेता फरहान अख्तरची प्रेयसी शिबानी दांडेकरने रियाला सपोर्ट दिला आहे. शिबानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर रियाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तसंच रियाने सुशांतवर प्रेम केलं याचीच तिला शिक्षा मिळते असंही ती म्हणाली आहे.

“रिया १६ वर्षांची असल्यापासून मी तिला ओळखते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मी तिची आणि तिच्या कुटुंबाची एक नवीनच बाजू पाहते. ज्याचा आपण विचार करु शकत नाही अशा गोष्टी, त्रास ते सहन करत आहेत. प्रसारमाध्यमे कशाप्रकारे त्यांच्यासोबत वागत आहेत हे दिसून येतंय. एका निरपराध कुटुंबावर आरोप करण्यात येत आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होईल इथपर्यंत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे”, असं शिबानी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

I stand with you and by your side always @rhea_chakraborty #justiceforrhea

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

पुढे ती म्हणते, “रियाचे मुलभूत अधिकारदेखील हिसकावून घेतल्यासारखं वाटतंय. कारण सध्या प्रसारमाध्यमेच न्यायाधीश, परिक्षक आणि जल्लाद झाले आहेत. आम्ही पत्रकारितेची दोन्ही रुपं पाहिली आहेत. तिचा दोष काय होता? तिने एका मुलावर प्रेम केलं. त्याच्या पडत्या काळात त्याला साथ दिली, त्याला सावरलं. पण त्या मुलाने आत्महत्या केल्यावर आपण काय केलं. मी स्वत: पाहिलंय तिच्या आईची सध्या अवस्था काय झाली आहे. २० वर्ष देशाची सेवा करणाऱ्या तिच्या वडिलांवर याचा काय परिणाम होतोय. तिच्या भावाला वयापेक्षा जास्त लवकर मोठं व्हावं लागलं आणि किती खंबीर रहावं लागत आहे. माझी रिया तू खंबीर आहेस आणि तू कधीच खचणार नाहीस. तू लढत आहेस. तुला या सगळ्याचा सामना करावा लागतोय हे पाहून मला खरंच फार वाईट वाटतंय”.

दरम्यान, शिबानीने तिच्या पोस्टमध्ये रियाविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या शिबानी दांडेकरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली दात आहे.