पाणी हे जीवन आहे, असं म्हटलं जातं. पण पाणी वाचवण्यासाठी कितपत प्रयत्न केले जातात, हा खूप मोठा प्रश्न आहे. पाण्याच्या प्रश्नावर अनेक माध्यमांतून जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जे काही प्रमाणात यशस्वीही होत आहेत. मात्र या प्रयत्नांना जेव्हा सेलिब्रिटींच्या पाठिंब्याची जोड लाभते तेव्हा ते अधिक वेगाने लोकांपर्यंत पोहोचतात. यासाठी त्या कलाकारांमध्येही सामाजिक जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे असते. अशा प्रकारे सामाजिक जाणीव असलेला आणि त्यासाठी धडपडणारा अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश देत प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. त्याला मधुर भांडारकर, इम्तियाज अली, हंसल मेहता, अनिरुद्ध रॉय चौधरी या दिग्दर्शकांची साथ लाभणार आहे.

या चारही नामवंत दिग्दर्शकांनी पाणीबचतीच्या प्रश्नावर लघुचित्रपट तयार केले आहेत. जे नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरून प्रदíशत केले जाणार आहेत. जलसंवर्धनासाठी या वाहिनीने हाती घेतलेल्या ‘मिशन ब्लू’ या उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना फरहान अख्तर म्हणाला, आपल्या अगदी रोजच्या साध्या सवयींमधून पाणीबचत करणे शक्य असते. रोजच्या रोज आपली वाहने धुण्यापेक्षा आठवडय़ातून दोनदा जरी आपण वाहने धुण्यासाठी पाणी वापरले तरी आपण पाण्याची बचत करू शकतो. रोजच्या रोज कपडे धुण्यापेक्षा एकदिवसाआड कपडे धुतल्याने आठवडय़ाला किती पाणी वाचवले जाऊ शकते हे आपल्या लक्षात येईल. आपण जितके पाणी वाचवले असेल त्याची जाणीव आपल्याला निश्चितच समाधान देईल. ‘मिशन ब्लू’ या उपक्रमाच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. आपण रोजच्या जीवनात प्रत्येक कामासाठी किती लिटर पाणी वापरतो याची सविस्तर माहिती समजल्यामुळे तुम्ही किती पाणी वाचवू शकता याचा अंदाज तुम्हाला बांधता येतो.

या वेळी उपस्थित लेखक, दिग्दर्शक इम्तिआज अली यांनी माझे वडील हे अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये सहभागी होते, त्यामुळे लहानपणापासून माझी जलसंवर्धनाच्या प्रश्नाशी नाळ जोडली गेलेली आहे, असे म्हटले. ते पुढे म्हणाले, माझा ‘पाणी पंचायत’ हा चित्रपट माझ्या वडिलांना गावागावांत व दुर्गम भागात पाण्यावर आलेल्या अनुभवांवर अवलंबून आहे. मला एका लघुचित्रपटाद्वारे ही समस्या मांडण्यात नक्कीच आनंद होत आहे.

मधुर भांडारकर यांनी पाणी हा महत्त्वाचा प्रश्न असून ‘एक बाल्टी पाणी’ या लघुचित्रपटाद्वारे जलसंवर्धनासाठी जागतिक पातळीवर लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे म्हटले. या वेळी ‘पिंक’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी व दिग्दर्शक हंसल मेहता, नॅशनल जिओग्राफिकच्या बिझनेस हेड स्वाती महोन उपस्थित होत्या.