चार वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारी जोडपी, त्यांच्या नात्यांतील गुंता आणि नात्याकडे पाहण्याचा त्यांचा एकंदर दृष्टीकोन अशी गुंफण असलेले ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा काही महिन्यापूर्वी दिग्दर्शक अनुराग बासूनं केली. त्यामुळे चित्रपटात कोणत्या नव्या जोड्या पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. सिक्वलसाठी राजकुमार रावनंतर तापसी पन्नूचं नाव चर्चेत होतं. मात्र तापसीनं माघार घेतली असून आता तिच्याऐवजी दंगल गर्ल फातिमा सना शेखची वर्णी लागली आहे.
तापसी सध्या इतर चित्रपटात व्यग्र आहे. तसेच ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या चित्रीकरणासाठी तापसीकडे तारखा उपलब्ध नाहीत त्यामुळे तिनं या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये आता तापसीऐवजी फातिमा दिसणार आहे हे जवळजवळ निश्चित करण्यात आलं आहे.
फातिमासोबतच करिना कपूर, अर्जून कपूर, अभिषेक बच्चन इलियाना डिक्रूझ, राजकुमार राव, परणिती चोप्रा ही नाव देखील चर्चेत आहेत. सारेच मोठे कलाकार असल्यानं चित्रपटासाठी इतक्या कलाकारांच्या तारखा जुळवणं ही अनुरागसाठी तारेवरची कसरत होती. त्यानं स्वत:देखील हे कबुल केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलची पटकथा अनुरागनं स्वत: लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.
‘लाइफ इन अ मेट्रो’ पहिल्या भागात शिल्पा शेट्टी, कंगना रणौत, कोंकणा सेन शर्मा, शायनी आहुजा, शरमन जोशी, इरफान खान, धर्मेंद्र, के.के. मेनन , नसीफा अली अशी अनेक बड्या कलाकारांची मांदियाळी होती.
