सुवर्ण स्वराच्या शोधात…

‘स्वर्ण स्वर भारत’ या सांगीतिक स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यासमवेत सुप्रसिद्ध गायक पद्माश्री कैलास खेर आणि डॉ. कुमार विश्वास परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

|| गायत्री हसबनीस

आपल्या देशाच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती संगीताची मेजवानी देणारा ‘स्वर्ण स्वर भारत’ हा रिअ‍ॅलिटी शो नुकताच झी टीव्हीवर दाखल झाला आहे. या शोमधून गायक सुरेश वाडकर हे परीक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. आपल्या या अनुभवाविषयी आणि भक्ती संगीताविषयी पद्माश्री सुरेश वाडकर यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या…

‘‘आजकाल भारतीय संगीताला एक पाश्चात्त्य स्वरूप देण्यात आले आहे. कित्येकदा गायकांनी गाण्यात वापरलेले शब्द काय गायले आहेत हेच स्पष्टपणे समजून येत नाही. संगीत हे इतके पाश्चात्त्यीकरणाकडे झुकले आहे की शेवटी त्याचे विद्रूपीकरण झाल्यासारखे वाटते,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सुरेश वाडकर यांनी अनेक भाषांमध्ये आपली गाणी स्वरबद्ध केली आहेत, त्यांच्या सुरेल आवाजातील भक्तिगीते, भजने आजही रसिकांच्या मनांमध्ये घर करून आहेत. ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘स्वर्ण स्वर भारत’ हा कार्यक्रम भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या काळात संगीतातील मोठे बदल पचवलेल्या आपल्या देशात वर्तमानातील संगीतात झालेल्या बदलांबद्दल त्यांनी विस्तृत विचार मांडले. ‘‘आपली हिंदी आणि मराठी संगीताची जाज्वल्य संस्कृती आहे ती सगळी ‘नवीन’ करण्याच्या नादात त्याचे स्वरूपच बदलले गेले आहे. ते अधिक विद्रूप होत गेले तर काहीच खरे नाही. आजकाल नवीन गाणी फार वेळ टिकत नाहीत, चालतही नाहीत हा जो एक दोष निर्माण झाला आहे त्याला उपाय काय, याचा विचार व्हायला हवा. कारण सगळ्याच गोष्टी समजावता येत नाहीत. शहाण्याला फक्त इशाराच पुरेसा असतो, पण समजावणाऱ्याला समोरच्याने अतिशहाणा म्हणून टाळायचेच ठरवले तर त्यात नुकसान कोणाचे,’’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘स्वर्ण स्वर भारत’ या सांगीतिक स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यासमवेत सुप्रसिद्ध गायक पद्माश्री कैलास खेर आणि डॉ. कुमार विश्वास परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे तिन्ही सन्माननीय परीक्षकांना सूर, भाव आणि सार यांच्या जोरावर परीक्षणाची धुरा सांभाळायची आहे. आपल्या परीक्षणाच्या प्रमाणपद्धतीबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘‘मी स्पर्धकांच्या संगीताबद्दल बोलणार आहे, म्हणजे स्पर्धक कसा गायला, त्याचे सूर कसे लागले, शब्द कसे उच्चारले, गाण्यातील भाव कसे आहेत आणि सादरीकरण कसे आहे. कुमार विश्वासजी तर भक्ती संगीताच्या त्या कथेतला सार, अर्थ यावर परीक्षण करणार आहेत. ते उत्तम गायक असल्याने भक्ती संगीताच्या कथाही यानिमित्ताने सादर करतील. कैलासजीही गाण्यातील भाव टिपणार आहेत, त्यामुळे तिघेही मिळून एकत्रपणे स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहोत,’’ असे सुरेश वाडकरांनी स्पष्ट केले. ही संपूर्ण कल्पना अत्यंत सुंदर असल्याने हा कार्यक्रमही नक्कीच उठावदार होईल आणि प्रेक्षक उचलून धरतील याची आपल्याला पूर्ण खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना पुन्हा भक्ती संगीताकडे नेण्याचा हा जो मोठा प्रयत्न आहे तो नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

मंदिरांचा भव्यदिव्य देखावा या शोच्या सेटवर उभारण्यात आला आहे. भक्ती संगीतामध्ये खूप ताकद आहे. ८० टक्के रसिक प्रेक्षक आजही आवर्जून सांगतात की, आमची सकाळ तुमच्या भक्ती संगीताने, अभंगांनी होते. ही खूप मोठी पोचपावती आहे. भर प्रहरी अशी अनेक मंडळी आहेत जे पूजाकार्य करतात तेव्हा सकाळी सकाळी तद्दन हिंदी चित्रपट संगीत वाजवत नाहीत. तर ते देवावरील भक्तीमुळे भजने ऐकतात, अभंग ऐकतात आणि या करोना महामारीमुळे तर भक्ती संगीताचे महत्त्व अजूनच वाढले आहे. श्रद्धेची ताकद अजूनही मोठी आहे याची जाणीव लोकांना झाली आहे. देवच संकटाला तारू शकतो त्यामुळे भक्ती संगीताची ताकद फार अफाट आहे, असे मत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले.

स्पर्धा नाही तर ही जनसेवा…

ही स्पर्धा असली तरी यातला लोकांना भक्ती संगीताकडे वळवण्याचा विचार आहे तो महत्त्वाचा आहे, असं सांगत या करोना भयातून बाहेर काढत मानसिक शांती आणि सकारात्मक शक्ती देत प्रेक्षकांना प्रफुल्लित करण्याचा हेतू महत्त्वाचा ठरणार आहे. करोना, ओमायक्रॉनसारख्या रोगांच्या पार्श्वभूमीवर एक मानसिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे सामर्थ्य हा कार्यक्रम साधणार आहे, जी खूप मोठी लोकसेवा आहे, असे प्रामाणिक मत त्यांनी व्यक्त केले. 

भक्ती संगीताची ताकद मोठी…

संगीत कंपन्यांना चित्रपटांच्या संगीतातून, गाण्यातून जेवढे उत्पन्न मिळत नसेल तेवढे ते भक्ती संगीतातून मिळाले आहे आणि मिळते आहे. मी स्वरबद्ध केलेल्या ‘ओमकार स्वरूपा’ या गाण्याला ४० वर्षे उलटून गेली तरीही ते प्रेक्षकांच्या अजूनही मनात आहे. त्यामुळे भक्ती संगीताची ही किमया आणि ताकद कधीच ऱ्हास पावणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Feast of devotional music on the occasion of independence day golden voice india reality show zee tv akp

Next Story
नवं काही : ‘भौकाल २’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी