– किशोर अर्जुन

नुकत्याच झालेल्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये मणिपुरी सिनेमा ‘बुन्ग’ला ‘बेस्ट चिल्ड्रेन अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने भारतीय सिनेसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या सन्मानाचे कौतुक झालेच; पण या चित्रपटाच्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी असल्याने त्याला आणखी एक अर्थ प्राप्त होतो. कारण भारतीय सिनेमात गेल्या काही दशकांत स्त्री दिग्दर्शिकांची वाढती उपस्थिती केवळ प्रतिनिधित्वापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती सिनेमाच्या कथनभाषेलाही नवा आयाम देत आहे.

जागतिक पातळीवर पाहिले तर सिनेसृष्टी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पुरुषप्रधान राहिली आहे. तरीही या चौकटीत स्वत:चे स्थान निर्माण करत अनेक स्त्रियांनी दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. १८९६ मध्ये एलिस गाय ब्राशे हिने ‘द कॅबेज फेअरी’ हा चित्रपट दिग्दर्शित करत जगातील पहिली महिला दिग्दर्शिका म्हणून इतिहासात नोंद केली. भारतातही १९२६ मध्ये ‘बुलबुल ए फरिश्ते’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत फातमा बेगम या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शिका ठरल्या. या चित्रपटाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

या शतकभराच्या प्रवासात भारतातील विविध भाषांमध्ये अनेक स्त्री दिग्दर्शिका पुढे आल्या. विशेषत: गेल्या काही दशकांत मल्याळम, तमिळ, बंगाली, आसामी, हिंदी आणि मराठी सिनेमांत विविध सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक अनुभवांवर भाष्य करणारे अनेक संवेदनशील आणि प्रयोगशील सिनेमे या दिग्दर्शिकांनी निर्माण केले आहेत. तिकीटबारीपासून ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपर्यंत महिला दिग्दर्शित सिनेमांना मिळणार्‍या प्रतिसादातून भारतीय सिनेमाच्या कथनभाषेला नवा आयाम तयार होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जागतिक स्तरावर दखल

बाफ्टा पुरस्कार मिळालेल्या बुन्ग सिनेमाला बालपट आणि कौटुंबिक गटात हा पुरस्कार मिळालेला असला तरी, सिनेमाचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की, हा फक्त रंजन करणारा सिनेमा नाही. तर स्थानिक राजकीय परिस्थिती आणि विचार मांडणारा महत्त्वाचा सिनेमा आहे. पीके, लक्ष्य, तलाश यांसारख्या गाजलेल्या सिनेमांच्या साहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या लक्ष्मीप्रिया यांचा दिग्दर्शिका म्हणून बुन्ग हा पहिलाच सिनेमा आहे. त्याचवेळी गेल्या दोन वर्षात ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’च्या निमित्ताने कान सिनेमहोत्सवात ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावलेल्या पायल कपाडिया हिचासुद्धा तो पहिलाच सिनेमा होता.

गेल्या वर्षी ॲकॅडमी (ऑस्कर) पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला ‘लापता लेडीज’ हा गाजलेला सिनेमा किरण रावने दिग्दर्शित केला होता. त्यापूर्वी ‘धोबीघाट’ (२०११) या सिनेमाचे दिग्दर्शन करत १०० मिनिटांमध्ये देखील पडद्यावर गोष्ट सांगता येऊ शकते हे दाखवून दिले. आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या सिनेमांचा ट्रेण्डच आला.

मल्टिफ्लेक्सच्या रुजण्याच्या काळात अशा प्रकारचा सिनेमा घेऊन येत ‘ट्रेन्डसेटर’ होण्याचा मानदेखील एका महिलेनेच मिळवला आहे. दुसरीकडे संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केलेला ‘संतोष’ सिनेमादेखील जगभरात चर्चेत होता. एका विधवा स्त्रीची पोलीस दलात प्रवेशानंतर घडणारी कथा सांगताना हा चित्रपट जात, सत्ता आणि संस्थात्मक हिंसा यांसारख्या प्रश्नांकडे निर्भीडपणे पाहतो.

प्रादेशिक सिनेमांचे रुंदावणारे क्षितिज

भारतात सर्वसाधारणत: हिंदी सिनेमांना अधिक प्रसिद्धी मिळत असली तरी इतर प्रादेशिक भाषांमध्ये खूप प्रयोगशील सिनेमे होत आहेत, आणि त्यातही या दिग्दर्शिकांचे स्थान, महत्त्व आणि कर्तृत्व खूप मोलाचे आहे. आसाममधील रिमा दास हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. त्यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार’ सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि जगभरातील सिनेमहोत्सवांमध्ये गाजला. ग्रामीण आसाममधील एका मुलीच्या स्वप्नांची कथा सांगणार्‍या या सिनेमात वास्तववादी शैली आणि काव्यात्मक चित्रभाषा दिसते. तर रजनी बासुमंत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘वाईल्ड स्वान्स’ ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत त्यांच्या आकांक्षा आणि संघर्ष यांचा तो मागोवा घेतो.

दक्षिणेकडे केरळच्या अंजली मेनन यांनी नातेसंबंध, कुटुंब आणि गत:स्मृती यांचे सूक्ष्म चित्रण आपल्या ‘बंगलोर डेज’ आणि ‘कुडी’मधून प्रामुख्याने दाखवले. तर सुधा कोंगरा या तमीळमधील अग्रणी दिग्दर्शिका म्हणून ख्यातकीर्त आहेत. ‘सुराई पोट्रू’ या सिनेमाने देशात आणि जगभरात वाहवा आणि पुरस्कारांची लयलूट केली. तर यावर्षी आलेल्या ‘पराशक्ती’ने तमिळनाडूच्या भाषिक अस्मितेच्या लढ्याची नव्या पिढीला पुन्हा ओळख करून दिली. कृतिंगा उदयनिधीचे ‘काली’, ‘कादलिगा नेरमलाई’, ‘वनक्कम चेन्नई’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रिया कृष्णस्वामीचा ‘भारम’ तर पुढे वेंट्रीमारनने प्रदर्शित केला. दुसरीकडे अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या गीतू मोहनदासने ‘लायर्स डायस’, ‘मुथुम’ या सिनेमातून देशविदेशातील पुरस्कारांना गवसणी घातली. ‘टॉक्सिक’ या त्यांच्या आगामी सिनेमाची वाट तर दक्षिण भारतासह देशभरातील प्रेक्षक पाहत आहे.

हिंदी सिनेप्रवाहातील स्थान

हिंदी सिनेमातही दिग्दर्शिकांनी वेगवेगळ्या काळात महत्त्वाचे प्रयोग करत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘निल बट्टे सन्नाटा’ या सिनेमाने मध्यमवर्गीय वास्तव आणि आई मुलीच्या नात्याची संवेदनशील कथा प्रभावीपणे मांडली. तर रीमा कागती यांनी ‘तलाश’ आणि ‘गोल्ड’ यांसारख्या सिनेमातून मुख्य प्रवाहातील सिनेमाला वेगळा कथनात्मक आयाम दिला. अलंकृता श्रीवास्तव यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ने स्त्रियांच्या स्वातंत्र्य, लैंगिकता आणि सामाजिक बंधनांवर मोठी चर्चा घडवून आणली.

विचारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदिता दास यांनी ‘फिराक’, ‘मंटो’ आणि ‘झ्विगाटो’ या सिनेमांमधून सामाजिक वास्तव आणि मानवी संघर्षांवर भाष्य केले. तर ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ‘वॉटर’ या सिनेमांतून दीपा मेहता यांनी भारतीय समाजातील स्त्री प्रश्न आणि सांस्कृतिक गुंतागुंती आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडल्या. नव्या पिढीत झोया अख्तर, मेघना गुलजार आणि गौरी शिंदे या दिग्दर्शिकांनी सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर नव्या पद्धतीने कथा मांडत हिंदी सिनेमाला समकालीन सामाजिक वास्तवाशी जोडून ठेवले आहे.

सई परांजपे या भारतीय सिनेसृष्टीतील संवेदनशील आणि वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शिका म्हणून विशेष ओळखल्या जातात. ‘स्पर्श’, ‘चष्मे बद्दूर’ आणि ‘कथा’ या सिनेमांतून त्यांनी मानवी नातेसंबंध, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचे सूक्ष्म चित्रण केले. साध्या कथांमधून मानवी भावविश्वाचा उलगडा करण्याची त्यांची शैली भारतीय सिनेमात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. दुसरीकडे मुख्य प्रवाहातील मनोरंजनप्रधान सिनेमातही दिग्दर्शिकांनी स्वत:ची छाप निर्माण केली आहे. सुरुवातीला नृत्यदिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या फराह खान यांनी ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या सिनेमातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरलेले मसालेपट साकारले.

स्त्री दिग्दर्शिकांची वाढती उपस्थिती हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही. त्यांच्या सिनेमांमधून भारतीय समाजातील अनेक अनुभव, संघर्ष आणि नातेसंबंध नव्या दृष्टीने पडद्यावर येत आहेत. प्रादेशिक वास्तव, सामाजिक बदल, लैंगिक राजकारण आणि वैयक्तिक भावविश्व यांचा वेध घेत या दिग्दर्शिका भारतीय सिनेमाच्या कथनभाषेला अधिक व्यापक आणि संवेदनशील बनवत आहेत. त्यामुळे महिला केवळ सिनेमा निर्माण करत नाहीत, तर आपल्या समाजाकडे पाहण्याची एक वेगळी आणि अधिक मानवी दृष्टीही प्रेक्षकांना देत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्री दिग्दर्शक

दिग्दर्शिकेच्या भूमिकेतून मराठीमध्ये सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्याबरोबर केलेले काम प्रचंड आहे. त्यांनी रुपेरी पडद्यावर जेवढ्या विविधांगी विषयाला गवसणी घातली आहे, तेवढे विषय क्वचितच अन्य कोणी केले असतील. मानवी मन आणि सामाजिक वास्तव यांचा सातत्याने चिंतनशील वेध त्यांनी आपल्या कलाकृतीतून घेतला. त्यांच्या सिनेमात साहित्यिक संवेदनशीलता नेहमीच दिसते. दरम्यानच्या काळात समृद्धी पोरे यांनी ‘मला आई व्हायचंय!’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे झ्र् द रिअल हिरो’ यांसारख्या सिनेमांतून सामाजिक विषय प्रभावीपणे मांडले. तर अगोदरच्या पिढीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांनी देखील ‘सासर माहेर’, ‘अशी असावी सासू’ या कौटुंबिक जिव्हाळ्याचे विषय दिग्दर्शित केले. त्याचप्रमाणे मृणाल कुलकर्णी यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ऐतिहासिक ‘रमा माधव’ या सिनेमांद्वारे दिग्दर्शनात वेगळी ओळख निर्माण केली. स्वप्ना वाघमारे-जोशी या ‘सविता दामोदर परांजपे’, ‘लाल इश्क’, ‘फुगे’, ‘मितवा’ हे सिनेमे घेऊन आल्या. स्मिता तळवलकर, प्रतिमा जोशी, सुषमा शिरोमणी, कांचन अधिकारी, श्रावणी देवधर आदी महत्त्वाच्या दिग्दर्शिकांनी मराठीमध्ये आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला आहे. सध्याच्या पिढीत क्रांती रेडकर, मनवा नाईक आणि मृण्मयी देशपांडे अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत काम करत मराठी सिनेमात नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तिघी’या सिनेमाच्या मध्यमातून जिजीविषा काळे या नव्या दिग्दर्शिकेचे कामदेखील प्रेक्षकांना आवडलेले दिसत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बदललेला सिनेमा

गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढीचा फायदा या दिग्दर्शिकांना नव्या संधी निर्माण होण्यात नक्कीच झाला आहे. पारंपरिक बॉक्स ऑफिसच्या चौकटीत बसत नसलेल्या कथा आता ओटीटीच्या माध्यमांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. आणि त्यासाठी या दिग्दर्शिकांना सिनेमाच्या यशाचे गणित सांगत निर्मिती संस्थांच्या फेर्‍या मारत बसायची गरज राहिलेली नाही. ओटीटीमुळे मध्यम बजेटचे आणि प्रयोगशील विषय असलेले सिनेमे किंवा वेबसीरिज सहज साकारता येतात. त्यामुळे दिग्दर्शिकांना त्यांना पाहिजे असलेल्या विषयावर, सामाजिक वास्तव, ्त्रिरयांचे अनुभव, लैंगिकता यांसारख्या विषयांवर अधिक मुक्तपणे काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. स्त्रियांच्या सिनेमात अनेकदा कथनशैलीतही वेगळेपणा दिसतो. मुख्य प्रवाहातील दिग्दर्शक आपल्या गोष्टी संघर्ष, हिरोइजम आणि नाट्यमय घटना यांना झुकते माप देतात, त्याउलट बहुतांश दिग्दर्शिका मात्र भावनिक अनुभव, नातेसंबंध आणि रोजच्या जगण्यातील छोटे छोटे अनुभव सहजगत्या गोष्टीत विणताना दिसतात. घर, स्त्रियांची मैत्री, नातेसंबंध, आणि वैयक्तिक संघर्ष यांसारखे विषय त्यांच्या सिनेमाच्या केंद्रस्थानी कित्येकदा असतात. महिलांच्या अनुभवांना कथानकाच्या केंद्रस्थानी स्थान देणार्‍या ‘फिमेल गेज’मधून या गोष्टी पडद्यावर साकारल्या जातात.

(लेखक पटकथा लेखक, दिग्दर्शक आहेत)