लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. झी मराठी वाहिनीवर मर्यादित भागांच्या नवीन मालिका आणि रिअॅलिटी शोज प्रसारित होणार आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.

प्रेक्षकांच्या दिवसाची सुरुवात आता ‘राम राम महाराष्ट्र’ या कार्यक्रमाने आणि त्यात भगरे गुरुजींच्या ‘श्लोक, दिनविशेष आणि वेध भविष्याचा’ याने होईल. सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तसेच या लॉकडाउनमध्ये तमाम वहिनींना पैठणीचा खेळ खेळण्याची संधी मिळेल. संध्याकाळी ६.३० वाजता आदेश भावोजी ‘होम मिनिस्टर घरोघरी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा वहिनींशी गप्पा मारण्यासाठी सज्ज होणार आहेत. लॉकडाउन काळात सर्वजण घरात बसले असताना वहिनी आणि मिस्टरांमधील काही रंजक गोष्टी पत्राद्वारे आपल्या समोर येतील. घरकामात मिस्टरांची वहिनींना कशी मदत होते, ह्याचे काही मजेशीर क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

आणखी वाचा : “त्या कठीण काळातून मी बाहेर येईन असं वाटलं नव्हतं”; परिणीतीने सांगितला नैराश्याचा अनुभव

या शिवाय ‘घरात बसले सारे’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लाडका बोलका बाहुला अर्धवट राव, आवडाबाई त्यांच्या फॅमिली प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. घरातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच छोटू सिंगची लव्हस्टोरी या मालिकेचे खास आकर्षण असणार आहे, हा कार्यक्रम संध्या. ७ वाजता पाहता येणार आहे.