‘फोर के’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या माहीम येथील सिटीलाइट चित्रपटगृहात १२ ते १९ जून या कालावधीत पहिल्या ‘सिटीलाइट मराठी चित्रपट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जुन्या आणि नव्या मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. किरण आणि सई ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट समीक्षक-अभ्यासक सुधीर नांदगावकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दररोज एक जुना आणि एक नवा असे दोन चित्रपट सायंकाळी साडेपाच आणि रात्री आठ या वेळेत दाखविले जाणार आहेत. सिटीलाइट चित्रपट महोत्सवाची सुरुवात १२ जून रोजी गजेंद्र अहिरे यांच्या ‘अनवट’ या चित्रपटाच्या प्रिमियरने होईल. हा चित्रपट रात्री आठ वाजता सादर होईल. त्यापूर्वी सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या वेळी चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या वेळी महोत्सवाचे संयोजक किरण व सई ठाकूर, सुधीर नांदगावकर, गजेंद्र अहिरे, पंकज कपूर, जयवंत वाडकर, मकरंद वागस्कर, नझर खान, असित रेडीज, ज्योती शेखर आदि उपस्थित होते.
महोत्सवातील इतर चित्रपट..
१३ जून :  पु. लं आणि अस्तु
१४ जून : नवरी मिळे नवऱ्याला व टिंग्या
१५ जून : पिंजरा व जोगवा
१६ जून : माहेरची साडी व शाळा
१७ जून : उंबरठा आणि खेळ मांडला
१८ जून : मराठा तितुका मेळवावा व पुणे ५२
१९ जून : रेगे