फिल्म रिव्ह्यूः यशवंतराव चव्हाण.. बखर एका वादळाची

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेल कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेल कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबत सामाजिक आणि राजकीय जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करणार्‍या यशवंतरावांचा जीवनपट यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. कराड तालुक्यातील देवराष्ट्रे गावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मुलगा पुढे महाराष्ट्राबरोबर देशाचेही भविष्य घडवतो हा इतिहास भूतकाळ सांगणारा असला, तरी तो वर्तमानाशी निगडित आहे; महान व्यक्ती या काळानुसार लोप पावत नाहीत, तर त्या स्वत: एक विचार असतात. त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी व आदर्शवत असते. मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी विविध मानाची व जबाबदारीची पदे भूषविलेले लोकाभिमुख नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा रोमहर्षक प्रवास सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलं जातं, नंतर केंद्रात अनेक महत्त्वाची खाती समर्थपणे त्यांनी सांभाळली, अगदी उपपंतप्रधानही झाले, यामागे होता त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष..पण हा प्रवास अतिशय जुनाट आणि सरकारी डॉक्युमेंटरीच्या पद्धतीने चित्रपटात सादर करण्यात आला आहे. व्हीएफएक्स सारख्या आधुनिक तंत्राचा वापरसुद्धा अतिशय बाळबोध प्रकारे करण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या बालपणापासून ते राजकीय पुढारी होईपर्यंतचा प्रवास जरा नाट्यमय झाला, पण त्यापुढे, म्हणजे मध्यांतरानंतर सगळ्याच पातळयांवर गोंधळ उडाला. यशवंतराव यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, तुरुंगवासात मार्क्सवाद, समाजवाद याच्याशी आलेला संबंध, पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सहन करावी लागलेली टीका, महाराष्ट्र राज्याची स्थापनेपर्यंतचा भाग बघताना आपण चित्रपट बघतोय हे जाणवत.. पण यशवंतराव हे कसे कलाप्रेमी होते हे ज्याप्रकारे दाखवले आहे ते हसण्याजोगे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यशवंतरावांची ही बखर कोण सांगतंय हेच कळत नाही. प्राध्यापक नाना पाटेकर अमेरिकेहून आलेल्या मुलांना गोष्ट सांगत आहेत की, यशवंतराव स्वत: आपल्याशी बोलत आहेत की, मध्येमध्ये डोकावणारा शाहीर हाच सुत्रधार आहे? काहीच कळत नाही. यशवंतरावांच्या कर्तृत्वाचं काही प्रमाणात विश्लेषणही मध्येमध्ये येतं. तसेच यात घाशीराम कोतवाल, नटसम्राट, श्यामची आईचे प्रसंग जे अगदीच अनावश्यक होते, ते मात्र आवर्जून आहेत.
महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी. चित्रपटात काही त्रुटी असतानाही असतानाही बालपणीचे, तरूणपणीचे अन् आपल्या मनात घर करून असणा-या यशवंतराव साकारणा-या तिन्ही कलावंतांची निवड अगदी योग्य करण्यात आली आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही. या तिनही कलावंतानी यशवंतरावांच्या भूमिकेस खरा न्याय दिला आहे. यासोबत यामधील संगीत अन् त्याच्या वापराला विशेष श्रेय द्यावे लागेल. त्यामुळे आनंद मोडक अन् त्यासोबत पार्श्वसंगीत करणा-या नरेंद्र भिडेचं आवर्जून कौतुक करावं लागेल. विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शाहीर अण्णाभाऊ साठे, ना. धों.महानोर अन् विठाबाई चव्हाण यांच्या कवितांचा केलेला वापर हा अत्यंत खुबीने अन् हुशारीने केल्याचं प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. यशवंतरावांच्या आई विठाबाई चव्हाण या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. त्यांच्या याच प्रतिभेची झलक या चित्रपटातील गाण्यांमधूनही बघायला मिळते.
दिग्दर्शकः जब्बार पटेल
कलाकार: नाना पाटेकर, अशोक लोखंडे, ओम भूटकर, लुब्ना सलीम
पटकथा: अरुण साधू
पार्श्वसंगीतः नरेंद्र भिडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Film review yashwantrao chavan bakhar eka vadlachi

ताज्या बातम्या