रसिका शिंदे

मराठी चित्रपट म्हटलं की स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील छोटंसं खेडेगाव, तिथलं निसर्गसौंदर्य, नऊवारी किंवा पारंपरिक मराठी साडी परिधान केलेली अभिनेत्री आणि गुरांना चारा घालणारा किंवा शेतात राबणारा अभिनेता असं चित्र आपल्या डोळय़ांसमोर उभं राहायचं; परंतु काळ बदलत गेला, तंत्रज्ञान आधुनिक होत गेलं तसा आपला मराठी चित्रपटही आधुनिक होत गेला. मराठी चित्रपटांचं चित्रीकरण प्रामुख्याने कोल्हापूरच्या चित्रनगरीत, मुंबईच्या चित्रनगरीत अथवा महाराष्ट्रातील ठरावीक गावांतून केलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षांत कथानकातील बदलांबरोबरच चित्रीकरणासाठीही मराठी चित्रपटांनी परदेशवारी करायला सुरुवात केली आहे.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

चित्रपटाचे कथानक जसे बदलत गेले तशी चित्रीकरणाच्या ठिकाणांबद्दलही अपेक्षा वाढत गेली. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये बऱ्याच मराठी चित्रपटांचे संपूर्णपणे परदेशात चित्रीकरण करण्यात आले. याआधी चित्रपटातील कथेच्या अनुषंगाने काही भाग हा परदेशात चित्रित केला जात होता खरा, पण ‘ती अँड ती’ हा मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग निर्मित पहिला मराठी चित्रपट परदेशात म्हणजेच लंडनमध्ये चित्रित करण्यात आला. त्यानंतर ‘मिस यु मिस्टर’, ‘येरे येरे पैसा २’, ‘दे धक्का २’, ‘झिम्मा’, ‘मन फकीरा’, ‘व्हिक्टोरिया’ असे अनेक चित्रपट परदेशात चित्रित झाले आहेत. परदेशात चित्रीकरण करायचं म्हणजे निर्मिती खर्च हा मोठय़ा प्रमाणात होणारच. याबद्दल बोलताना निर्माता- दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, ‘‘परदेशात चित्रीकरण करणं हे आपल्या देशात चित्रीकरण करण्यापेक्षा कमी खर्चीक आहे. याचं कारण असं की मुंबईत एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर चित्रीकरण करायचं असल्यास एका दिवसाचं भाडं दोन लाख रुपयांच्या आसपास आहे. बांद्रा-वरळी सी-लिंकच्या समोर चित्रीकरण करायचं असल्यास अडीच लाख रुपये किंवा बांद्रा बॅन्ड स्टॅन्डवरील किल्ल्यावर चित्रीकरण करायचं असल्यास दीड लाख रुपये एका दिवसाचे भाडे आकारले जाते; परंतु हेच जर परदेशात चित्रीकरण करायचे असेल तर तेथील सरकारच्या ठरावीक जागा किंवा तिथल्या पालिकेच्या जागा यांचे एका दिवसाचे भाडे हे दहा ते वीस हजार रुपये इतकेच असते. याव्यतिरिक्त रस्त्यावर कलाकार किंवा तंत्रज्ञ मंडळी यांच्या अतिरिक्त गाडय़ा लागल्या असल्या तरीही कोणताही दंड आकारला जात नाही किंवा पोलीस येऊन तुम्हाला जाब विचारत नाहीत.’’ त्यामुळे परदेशात मराठी चित्रपटांचे चित्रीकरण करणे हे भारतापेक्षा कमी खर्चीक असल्याचे हेमंत स्पष्ट करतो.

अलीकडे अनेक मराठी चित्रपट परदेशात चित्रित केले जात असल्यामुळे आपल्या देशात चित्रीकरणासाठी ठिकाणे नाहीत का? किंवा हिंदी चित्रपट मोठय़ा प्रमाणात परदेशात चित्रित केले जातात म्हणून मराठी चित्रपट निर्मात्यांना भारतात किंवा महाराष्ट्रात चित्रीकरण करावेसे वाटत नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर निर्माता आणि अभिनेता पुष्कर जोग म्हणतो, ‘‘चित्रपटाच्या कथेला न्याय मिळणारे कोणतेही ठिकाण असले पाहिजे. उगाच कथेत लिहिले आहे की लंडनमध्ये चित्रीकरण करायचे आहे; पण जर कथा आणि चित्रीकरणाचे ठिकाण यांचा काही ताळमेळच बसत नसेल तर तो बसवणं ही निर्मात्यांची महत्त्वाची जबाबदारी असते. कथेला साजेसे असे ठिकाण दाखवले तरच इतके लांब परदेशात जाऊन चित्रीकरण केल्याचे आणि त्यासाठी लागणारा पैसा मार्गी लागल्याचे समाधान निर्मात्यांना मिळते.’’ त्याची निर्मिती आणि भूमिका असलेला ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट पूर्णपणे परदेशात चित्रित करण्यात आला आहे. ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाची निर्मिती करत असताना चित्रपटाचे कथानक हे भयपटाचे असल्यामुळे भीतीदायक दिसणारा वाडा ही या चित्रपटाच्या कथेची गरज होता. त्यामुळे असे ठिकाण हवे होते जिथून कथेतील नायक व नायिकेला बाहेरच पडता येत नाही आणि प्रेक्षकही चित्रपट पाहताना त्या ठिकाणी स्वत: अडकला आहे असे या भयपटातून अनुभवतो. त्यामुळे स्कॉटलँडमधील तो भयावह वाडा निवडण्यात आल्याचे पुष्कर सांगतो. त्यामुळे परदेशात जरी चित्रीकरण करायचे असले तरी चित्रपटाच्या कथेची त्या ठरावीक ठिकाणी चित्रीकरण करण्याची कितपत गरज आहे यावर सारे काही अवलंबून असते,’’ असे पुष्कर सांगतो.

चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून परदेशात चित्रीकरण केले जाते. मात्र, यासाठी परदेशातील ज्या देशात चित्रीकरण करायचे आहे त्या देशाच्या सरकारची परवानगी मिळवणे, कलाकार, तंत्रज्ञ यांना आपल्या चमूमध्ये सहभागी करून घेणे, महत्त्वाचे म्हणजे तेथील सरकारकडून चित्रीकरणासाठी सवलत मिळवणे, या सगळय़ांत निर्माता फार महत्त्वाची कामगिरी बजावतो. मराठी चित्रपट हे प्रामुख्याने लंडनमध्ये चित्रित केले जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे चित्रीकरण करण्यासाठी पूरक वातावरण आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. लंडनमध्ये चित्रीकरण करायचे असल्यास निर्माता म्हणून ऑनलाइन एक फॉर्म भरायचा असतो ज्यात चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ कोण आहेत यांची संपूर्ण माहिती चोखपणे भरावी लागते. तसेच, ज्या भागात चित्रीकरण केले जाणार आहे तेथील निसर्गसौंदर्य, संस्कृती, भाषा, स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञांचा किती वापर करण्यात येणार आहे याची माहितीदेखील देणे अनिवार्य असते. त्यांच्या सरकारला पुरेशी माहिती दिल्यानंतर आपल्याला ठिकाणांची आणि इतर सोयीसुविधांची परवानगी दिली जाते आणि आपण तेथील संस्कृती, भाषा, निसर्ग हे इतर देशांच्या कानाकोपऱ्यापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवणार असल्याकारणाने मराठी चित्रपटांना एकूण निर्मिती खर्च जितका येतो त्यातील २५ टक्के रक्कम ही परत केली जाते. त्यामुळे परदेशात चित्रीकरण करणे कमी खर्चीक आणि कमी त्रासदायक असल्याचे हेमंत सांगतो. तसेच, महाराष्ट्र सरकारदेखील ३० अथवा ४० लाखांची रक्कम अनुदान म्हणून देत असल्याने मराठी निर्मात्यांना या दोन्ही बाबी दिलासादायक ठरतात, असे निर्माते नितीन वैद्य म्हणतात.

अन्य कोणत्याही ठिकाणी चित्रीकरण करायचे असल्यास तेथील हवामान, भौगोलिक परिस्थिती, भाषा यांचा सारासार विचार करावा लागतो. हवामानाच्या अडचणींचा सामना करताना जास्त त्रास होत नसल्याचे हेमंत आणि नितीन वैद्य सांगतात. मराठी चित्रपट हे जास्तीत जास्त लंडनमध्ये चित्रित केले जात असल्याकारणाने मे ते ऑगस्ट या कालावधीत तेथील हवामान हे चित्रीकरणासाठी पूरक असते आणि याच काळात तिथे जास्तीत जास्त चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते, असे हेमंत सांगतो. याशिवाय भाषेची अडचण पाहता यूकेमधील कोणत्याही देशात इंग्रजी भाषा मोठय़ा प्रमाणात बोलली जात असल्याने तेथील स्थानिक लोकांशी, स्थानिक निर्मात्यांशी संवाद साधताना अडचण येत नाही. मात्र, अलीकडे जपान आणि रशियामध्ये दोन मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले असता, तेथे इंग्रजी भाषेचा वापर अधिक होत नसल्या कारणाने संवाद साधण्यास थोडीफार अडचण आल्याची माहिती निर्माते शिलादित्य बोरा यांनी दिली. त्यामुळे भाषेची अडचण आल्यास निर्माते इंग्रजी व तेथील भाषा बोलता येऊ शकेल अशा स्थानिक कलावंतांची मदत घेतात, असेही बोरा यांनी सांगितले.

चित्रीकरण हादेखील एक व्यवसाय आहे. कॅमेरा एका ठिकाणी ठेवला आणि चित्रीकरण सुरू झालं असं होत नाही. त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी जिथे उपलब्ध असतील तिथे जाऊन चित्रीकरण करण्याचा प्रयत्न प्रत्येक निर्माता करत असतो. त्यामुळे कथानकाच्या दृष्टीने ठिकाणांची निवड केली जावी, असे हेमंत म्हणतो. यूकेमधील केवळ लंडनमध्येच मराठी चित्रपटांचे सर्वाधिक चित्रीकरण होते. तेथील इतर देशांचा विचार निर्मात्यांकडून केला जात नाही, असे निर्माती क्षिती जोग म्हणते. परदेशातील चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मराठी चित्रपटांतून परदेशातील विविध ठिकाणं पाहायला मिळत आहेत आणि आपला मराठी चित्रपट परदेशातही नाव कमावतो आहे, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही क्षितीने सांगितले.

परदेशवारीबाबत तारतम्य हवे
परदेशात चित्रीकरण करताना तेथील स्थानिक कलावंतांना आणि तंत्रज्ञांना संधी देणे तितकेच गरजेचे असते. याबद्दल माहिती देताना नितीन वैद्य म्हणतात, ‘‘चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने ७० ते ८० टक्के चित्रीकरण हे त्या देशातले असणे बंधनकारक असते. त्याशिवाय, मुख्य कलाकारांच्या आसपास असणारी लहान पात्रे ही तेथील स्थानिक कलाकारांनी साकारावी अशी अपेक्षा असते. तसेच, तेथील स्थानिक तंत्रज्ञांच्या सोबतीने तुम्ही काम केले तर त्याचा फायदा सरकारकडून देण्यात येणाऱ्या सवलतींमध्ये होतो.’’ कित्येकदा परदेशातील सरकार आपल्याला सवलती देत आहेत म्हणूनही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात केले जाते, अशी खंत हेमंत ढोमेने व्यक्त केली. याआधी परदेशात चित्रित झालेले काही चित्रपट हे मुंबई-पुण्यात चित्रित केले जाऊ शकत होते, पण सवलतीच्या मोहामुळे ते परदेशात चित्रित झाल्याचेही हेमंतने निदर्शनास आणून दिले. याशिवाय सवलतीचा मुद्दा अधोरेखित करत भारतातूनच तंत्रज्ञ आणि इतर कलाकारांची फौज घेऊन गेल्यास सवलत सहजासहजी मिळत नसल्याचेही त्याने सांगितले. प्रेक्षकांना सातत्याने परदेशीकरण मराठी चित्रपटात पाहावे लागत असल्यामुळे कंटाळा येतोच आणि हा कंटाळा येण्याआधीच निर्मात्यांनी परदेशात कितपत चित्रीकरण करावे, कितपत तेथील संस्कृती, सौंदर्य दाखवावे याचा सांगोपांग विचार निर्मात्यांनी करायला हवा, असेही हेमंत सांगतो.