Trisha Krishnan Shares Post : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचं अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर नाव जोडलं जात आहे. गेले काही दिवस दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. याचमुळे विजयच्या पत्नीनं त्याच्यावर अफेअर आरोप करत घटस्फोटदेखील मागितला असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान विजय आणि त्रिशा हे दोघे एका लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला एकत्र गेले होते. त्यांचे अनेक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर त्रिशानं एक पोस्ट शेअर केली आहे.

विजय अन् त्रिशा यांना एकत्र पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. विजयच्या पत्नीनं अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा दावा केलेली ही त्रिशाचं असणार असंही सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्रिशावर जोरदार टीका केली. त्यातच निर्माते आर. पार्थिबन यांनीसुद्धा त्रिशाबद्दल व्यक्तव्य केलं. यानंतर आता त्रिशाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे.

आर. पार्थिबन यांनी काय म्हटलं होतं?

एका अवॉर्ड सोहळ्यात बोलताना आर. पार्थिबन यांनी त्यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी स्क्रीनवर त्रिशाचा फोटो दिसताच त्यांनी म्हटलं, “ही काही दिवस घरीच राहिली तर बरं होईल. तिला बाहेर जाऊ देऊ नका.” विजय आणि त्रिशा यांचे रिसेप्शनमधील फोटो समोर आल्यानंतर पार्थिबन यांनी हे वक्तव्य केलं.

त्रिशा कृष्णननं पोस्टमध्ये काय म्हटलंय?

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्रिशाने लिहिलं, “नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला कळवलं की, एका व्यक्तीने आपल्या असिस्टंटमार्फत विनंती केल्यामुळे शेवटच्या क्षणी माझे नाव आणि फोटोचा समावेश करण्यात आला. हातात माईक आल्यावर केलेलं एखादं वक्तव्य विनोदी किंवा महत्त्वाचं ठरत नाही. खरंतर, माईकमुळे मूर्खपणा अधिक मोठ्या आवाजात ऐकू येतो. माहिती नसतानाही वापरलेले असभ्य शब्द ज्यांच्यासाठी वापरले जातात, त्यांच्यापेक्षा ते बोलणाऱ्या व्यक्तीबद्दलच खूप काही सांगून जातात.”

दरम्यान, या पोस्टमध्ये त्रिशानं कुणाचं नाव घेतलेलं नाही. पण पुरस्कार सोहळ्यात आर. पार्थिबन यांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्रिशानं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तिनं या पोस्टद्वारे पार्थिबन यांनाच अप्रत्यक्ष टोला लगावला असल्याचं म्हटलं जात आहे.

विजय अन् पत्नी संगीताच्या नात्याबद्दल

थलपती विजयची पत्नी संगीताने लग्नाच्या २७ वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिने विजयवर विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. याचिकेत तिने दावा केला आहे की, पतीचे एका अभिनेत्रीशी संबंध आहेत आणि याची माहिती त्यांना २०२१ मध्ये मिळाली. याचिकेत तिनं सासरच्या घरी राहण्याचा हक्क मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. हे दांपत्य मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत आहे. १९९९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.