बिग बॉस हा टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलर्स वाहिनीवरचा हा कार्यक्रम जगभरात पाहिला जातो. या शोचे चाहते बिग बॉसच्या १६व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस हा शो नेहमी टीआरपीच्या यादीत टॉपवर असतो. सलमान खान होस्ट करत असलेल्या नव्या सिझनबद्दलची नवी माहिती समोर आली आहे. बिग बॉसचा नवा सीझन १ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. पण याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

बिग बॉस १६ वा सीझन सुरू होण्याआधीच चर्चेचा विषय बनला आहे. नव्या सिझनमध्ये कोण सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तसेच या वेळी सलमान खानच्या जागी नवीन होस्टची वर्णी लागणार असल्याचेही म्हटले जात होते. पण त्याबद्दल कोणतीही घोषणा झाली नसल्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा : आमिरचा नव्हे तर धनुषचा ‘हा’ चित्रपट परदेशात रचतोय इतिहास, कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क

करोना काळात बिग बॉसचा पंधरावा सीझन प्रसारित झाला होता. चित्रपटसृष्टीसह या क्षेत्राला देखील करोनाचा फटका बसला. त्यामुळे सलमानने पंधराव्या सिझनच्या वेळी मोठ्या मनाने कमी मानधन घेतले. आता परिस्थिति नियंत्रणात आल्यावर सलमानने कमी केलेले मानधन पुन्हा वाढवले. बिग बॉसचा नवा सिझन सलमान खान होस्ट करत असल्याची अधिकृत घोषणा झाल्यामुळे सर्व अफवांना पूर्णविराम लागला. टेलिचक्करच्या अहवालानुसार सलमानने बिग बॉस १६ साठी १८० कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस १६ चा टीझर गेल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमामुळे टीझरची तारीख पुढे ढकलली गेली. ३ सप्टेंबरला झलक दिखला जा सुरू होणार आहे. तेव्हाच बिग बॉस १६ चा प्रोमो प्रदर्शित होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तसेच बिग बॉसच्या नव्या सीझनची सुरुवात १ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली असली तरी याबाबतची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे.

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची एक विशिष्ट थीम असते. यावेळची थीम ॲक्वा म्हणजेच पाण्याशी संबंधित असू शकते. राजीव सेन, मुनव्‍वर फारूकी, फैजल शेख, करण पटेल, दिव्‍यांका त्र‍िपाठी, चारु असोपा, जन्नत जुबैर असे स्पर्धक या शोमध्ये सहभागी होऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.