निखिल महाजन दिग्दर्शित, ‘जिओ स्टुडिओज’च्या आगामी ‘गोदावरी’ या चित्रपटाची ‘फ्रीप्रेस्की – इंडिया ग्रँड प्रिक्स’ या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पहिल्या सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली आहे. जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव अशा कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

‘फीप्रेस्की हा चित्रपट समीक्षकांचा आंतरराष्ट्रीय महासंघ आहे. फीप्रेस्कीच्या भारतीय विभागातर्फे निवडण्यात येणाऱ्या गेल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांमध्ये ‘गोदावरी’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी दिली. ‘गोदावरी’ चित्रपट आम्ही करोनाच्या काळात अगदी कमी साधनांचा वापर करून साकार केला आहे. आज हा चित्रपट जगभर दाखवला जातो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवतो आहे. लवकरच आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आपल्या प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटेल याची आता उत्सुकता लागून राहिली आहे, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.

आतापर्यंत ‘गोदावरी’ चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२’ मध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाची ‘ओपिनग फिल्म’ म्हणून निवड करण्यात आली होती. इफ्फी २०२१ मध्ये अभिनेता जितेंद्र जोशी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘सिल्वर पिकॉक’ पुरस्कार पटकवला असून दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्वर पिकॉक’ आणि विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला आहे. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’ मध्ये दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटातील संगीत विभागासाठी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांना सर्वोत्कृष्ट संगीत विशेष ज्युरी पुरस्काराने गौरवले आहे.