मितेश रतिश जोशी

गेले दोन वर्ष करोनामुळे दिवाळी नातेवाईकांबरोबर मिळून साजरी करण्याचा आनंद कलाकारांनाही फारसा लुटता आला नाही. यावेळी दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करायची संधी मिळाली आहे त्यामुळे एकीकडे चित्रीकरणाच्या वाढत्या वेळा सांभाळून दिवाळीचे बेत आखण्यात कलाकार मग्न आहेत. यानिमित्ताने दिवाळीच्या त्यांच्या आठवणी आणि यावर्षी दिवाळी कशी साजरी करणार याविषयी कलाकारांनी मनमोकळय़ा गप्पा मारल्या आहेत.

सेटवरची दिवाळी
मी वरळीत चाळ संस्कृतीत मोठी झाले. लहानपणी आमच्या घराजवळच सगळे नातेवाईक राहायचे. त्यामुळे दिवाळीला सगळं कुटुंब एकत्र यायचं. नरकचतुर्दशीला पहाटे घरातल्या बायका ताम्हणात कुंकुवाचं लाल पाणी तयार करतात. ते ताम्हण नवऱ्याच्या पुढय़ात नेऊन त्यात नरकासुर दाखवण्याची गावची जुनी पद्धत आमच्याकडे आहे. तेव्हाची काका काकूंची उडवली जाणारी खिल्ली ही माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. दिवाळीतला दिनक्रम आमचा ठरलेला असायचा. दरवर्षी त्याच हॉटेलमध्ये जेवायला जायचो. आता प्रत्येक जण कामाच्या निमित्ताने वेगळे झाले असले तरीही या आठवणी कायमच आनंद देणाऱ्या आहेत. यंदाच्या दिवाळीत मी नाशिकला चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे सेटवरच दिवाळीची धमाल करणार आहे. आकर्षक सजावटीने दिवाळीचा माहौल सेटवर तयार करणार आहोत. आम्ही नाशिकला ज्यांच्या घरात चित्रीकरण करत आहोत, त्या काकूंच्या हातचा फराळ खाण्यासाठीही मी उत्सुक आहे. – अक्षया नाईक, अभिनेत्री. (मालिका – सुंदरा मनामध्ये भरली)

नको ते फटाके
यंदाची दिवाळी खूप खास आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वीच गोरेगावला नवीन घरात राहायला आलो आहोत. त्यामुळे नवीन घरातली ही पहिली दिवाळी आहे. सलग काही वर्ष करत असलेल्या अहिल्याबाईच्या चित्रीकरणातून नुकतीच मोकळी झाल्याने दिवाळीसाठी घर सजवायला मी उत्सुक आहे. दरवर्षी मी आणि अभिजीत दिवाळीला नाशिकला जातो. माझे सासरे हे सेवानिवृत्तीनंतर एका सामाजिक संस्थेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षीचा आकाशकंदील आम्ही गरजू मुलांकडूनच विकत घेतो. दरवर्षी मी आणि अभिजीत सेटवर सर्व सदस्यांना भेटवस्तू देतो. या भेटवस्तूसुद्धा आम्ही गरजू मुलांकडूनच खरेदी करतो. दिवाळीचा आनंद त्या मुलांच्या आयुष्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. मी लहानपणी खूप फटाके वाजवायचे. दहावीला असताना मी पाऊस लावायला गेले. तो पाऊस माझ्या उजव्या हातावर फुटला आणि माझा हात चांगलाच भाजला. तेव्हापासून नको रे बाबा ते फटाके असं म्हणण्याची माझ्यावर वेळ आली. – सुखदा खांडकेकर, अभिनेत्री (मालिका – पुण्यश्लोक अहिल्याबाई)

तरुणाई गर्दी करते आहे..
माझं बालपण पुण्यात शनिवार पेठेत गेलं. आजकालच्या दिवाळीला एक ग्लॅमर आलं आहे. सगळं काही हटके वापरण्याच्या नादात सुवासिक साबण, सुवासिक तेल, सुवासिक दिवे यांना आजकाल बाजारात अच्छे दिन आले आहेत. पूर्वी आमच्या लहानपणी या सगळय़ाची क्रेझ नव्हती. सगळीकडे कसा अस्सल पारंपरिकपणा असायचा. आम्ही भावंडं एकत्र येऊन किल्ला बनवायचो. दिवाळीच्या सुट्टीत पाहुण्यांनी घर भरून जायचं. सगळय़ाच मैफिली या विशेष असतात, पण दिवाळी पहाटच्या मैफिली अधिक जवळच्या वाटतात. कारण त्यानिमित्ताने पहाटेचे राग गायले जातात, एरवी ते गायले जात नाहीत. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेत. पूर्वी फक्त नरकचतुर्दशीला सकाळी कार्यक्रम असायचे. आता पाडवा, भाऊबीजेलासुद्धा असतात. हे शक्य झालं आहे ते तरुणाईच्या उदंड प्रतिसादामुळे.. ‘बालगंधर्व’ आणि ‘कटयमर काळजात घुसली’ या चित्रपटांनी शास्त्रीय संगीत आणि नाटयम्संगीत तरुणांपर्यंत पोहोचविण्याची किमया केली. दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये युवकांची होणारी गर्दी हे त्याचेच द्योतक आहे. – आनंद भाटे, सुप्रसिद्ध गायक.

दिवाळीची वही
लहानपणी सहामाही परीक्षा झाली की मी पुण्याला आत्याकडे दिवाळीसाठी पलायन करायचो. शाळा सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी मी परत यायचो. तिकडे मी आणि माझी आतेभावंडं मिळून किल्ला बनवायचो. शाळेत दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने गृहपाठ दिला जायचा. तो गृहपाठ नेहमीच्या वहीत न करता वेगळी वही तयार करून पूर्ण केला जायचा. त्या वहीला तेव्हा ‘दिवाळीची वही’ म्हटलं जायचं. आता त्या वह्या कालबाह्यच झाल्या आहेत. माझी चित्रकला चांगली असल्याने मी मन लावून ती वही तयार करायचो. पण केव्हा ? शाळा सुरू होण्याच्या चार दिवस आधी. आते भावंडांची चित्रकला तितकी चांगली नसल्याने वेळात वेळ काढून त्यांनाही मदत करायचो. त्यामुळे ‘दिवाळीची वही’ कायमच धांदल उडवायची. अर्थात आता ही वही दिवाळीच्या आठवणींचा भाग झाली आहे. यंदाची दिवाळी खास आहे. दिवाळीत पूर्ण वेळ घरी देणार आहे. माझी मुलगी पाच वर्षांची आहे. तिला यावेळी मी फटाके फोडायला शिकवणार आहे. – कश्यप परुळेकर, अभिनेता. (मालिका – नवा गडी नवं राज्य)

गंगेवरची दिवाळी.
माझं लहानपण नाशिकला पंचवटीत गेलं. नाशिक हे एक धार्मिक शहर आहे. इथे असलेली पुरातन मंदिरं आणि शहरातून मधोमध वाहणारी गोदावरी नदी म्हणजे ‘आमची गंगा’. या आगळय़ावेगळय़ा शहरात दिवाळी साजरी करताना नेहमीच आनंद मिळतो. लहानपणी आम्हा सगळय़ा भावंडांना मिळून फटाके आणले जायचे. दिवाळीच्या आधीच फटाके फोडायला गुपचूप सुरुवात व्हायची. लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी गंगेच्या किनारी फटाके फोडायला जायचो. रंगीबेरंगी रांगोळीचे सडे, त्याच्या अवतीभोवती दिवे, संथ वाहणारी गंगा, त्याच्या जोडीला गुलाबी थंडीची चाहूल देणारी गार हवा अशा सुंदर वातावरणात उंच आभाळात फटाका फुटला की त्याचं रंगीबेरंगी प्रतिबिंब गंगेत दिसायचं. त्यामुळे गंगेवरची दिवाळी कायमच अविस्मरणीय आहे. आम्ही मावस भावंडं एकत्र येत घराजवळ किल्ला बनवायचो. दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरायला गेलो की घरच्या किल्ल्याची आठवण यायची. म्हणून जिकडे फिरायला जायचो तिकडेसुद्धा एक किल्ला बनवायचो. यंदाची दिवाळी माझ्या चिमूकल्या पुतणीबरोबर साजरी करणार आहे. यंदाची दिवाळी खास आहे, कारण आमच्या मालिकेने नुकतेच सहाशे भाग पूर्ण केले आहेत. – अक्षय मुडवादकर, अभिनेता. (मालिका – जय जय स्वामी समर्थ)

पारंपरिक दिवाळी.
मी एकत्र कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली हे माझं गाव. गावी आमचा ऐतिहासिक जुना वाडा आहे. शेणा मातीने सारवलेल्या जमिनीवर काढलेल्या आकर्षक रांगोळय़ा,पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या पाटावर आई – आजीच्या पुढय़ात अभ्यंग स्नानासाठी बसायला नशीबच लागतं. हे सगळं अनुभवण्यासाठी लोक आजकाल बक्कळ पैसे मोजतात, पण वाडय़ातल्या या पारंपरिक दिवाळीचा मी साक्षीदार आहे. चित्रीकरणामुळे आणि दोन वर्ष कोविडमुळे गावची दिवाळी अनुभवता आली नव्हती. पण यावर्षी दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी मी गावी जाणार आहे. लहानपणी गावी घरी दिवाळीसाठी इतर भावंडंसुद्धा एकत्र यायचे. आम्ही सगळे एकत्र घरी आल्यावर खूप दंगा करायचो. आम्हाला व्यग्र ठेवण्यासाठी व घरात शांतता नांदवण्यासाठी किल्ला बनवायला लावायचे, पण आमचा एक किल्ला बनवून कधी समाधान व्हायचं नाही. आम्ही पूर्ण सुट्टीत किमान तीन चार किल्ले बनवायचो. त्यात संपूर्ण घर एक होऊन आमच्या मदतीला असायचं. दिवाळी अशी एकत्र साजरी करण्याचा आनंदच काही और आहे. – अजिंक्य ननावरे, अभिनेता. (मालिका – सातव्या मुलीची सातवी मुलगी)

चित्रपट बघायला जाणार!
मी मूळचा पुण्याचा आणि माझं आजोळ जळगावचं. त्यामुळे लहानपणी मी दोन भिन्न शहरांमधली दिवाळी अनुभवली आहे. जळगावला आजी आजोबांकडे जायची ओढ कायमच असायची. त्यापेक्षा जास्त प्रवासाची उत्सुकता असायची. दिवाळीच्या सुट्टीत पुणे ते जळगाव आईबाबांबरोबर, चादर-उश्या घेऊन लाल परीतून केलेला रात्रीचा प्रवास आजही आठवतो. पुण्यात आमचा ओक वाडा आहे. लहानपणी आम्ही सगळे सख्खी चुलत भावंडं एकत्र येऊन मोठा किल्ला बनवायचो. कामावरून भांडण व्हायला नको म्हणून आम्ही शहाण्या बाळासारखे कामं वाटून घ्यायचो .किल्ल्यांवर लागणारे मावळे, वीर योद्धे, शेतकरी, कातकरी बायका अशा मूर्ती बाजारात जाऊन गोळा करण्याची हौस असायची. मावळे कोण आणणार हेही आम्ही वाटून घ्यायचो. त्यामुळे मोठय़ा कुटुंबातली एकत्र दिवाळी अनुभवण्याचं भाग्य माझ्या वाटय़ाला आलं. २०१९ च्या दिवाळीत ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यंदाच्या दिवाळीत ‘हर हर महादेव’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. त्याचीही उत्सुकता आहे. हा सिनेमा माझा नसला तरी तो मराठी सिनेमा आहे. त्यामुळे त्यावर मी तितकंच प्रेम करणार जितकं मी माझ्या सिनेमावर करतो. म्हणून यंदा दिवाळीत घरी वेळ देऊन, मंजिरीच्या हातचे रव्याचे लाडू खाऊन घरच्यांबरोबर ‘हर हर महादेव’ बघायला चित्रपटगृहात जाणार. प्रसाद ओक, अभिनेता