scorecardresearch

पहिला कोकण चित्रपट महोत्सव ९ ते १४ मेदरम्यान

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये येत्या ९ ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दोन्ही जिल्ह्यांतील ११ तालुक्यांमध्ये येत्या ९ ते १४ मेदरम्यान हा महोत्सव होणार आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये येत्या ९ ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दोन्ही जिल्ह्यांतील ११ तालुक्यांमध्ये येत्या ९ ते १४ मेदरम्यान हा महोत्सव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, दापोली, चिपळूण, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या आठ तालुक्यांमध्ये हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवाच्या आयोजनासाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदी मंडळींनी पुढाकार घेतला आहे. कोकणात मोठे चित्रपटगृह नाही. त्यामुळे फारसे मराठी चित्रपट तेथे पोहचत नाहीत. तसेच येथील कलाकारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात व्यासपीठही उपलब्ध होत नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’चे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. लवकरच विदर्भातही ‘विदर्भ चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात  येणार आहे, अशी माहिती पाटकरांनी दिली. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री किशोरी शहाणे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या महोत्सवात निवडक १० मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी ‘जीवनसंध्या’, ‘कानभट्ट’, ‘फनरल’, ‘भारत माझा देश आहे’, ‘८ दोन ७५’, ‘पल्याड’, ‘हिरकणी’, ‘प्रितम’, ‘मी पण सचिन’, ‘प्रवास’, ‘रिवणावायली’, ‘सिनियर सिटिझन’, ‘फिरस्त्या’, ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.       

या चित्रपट महोत्सवासाठी २०१९ ते २०२१ या कालावधीत एकूण ३८ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून अंतिम विजेत्या चित्रपटांची घोषणा १४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता मालवण, सिंधुदुर्ग येथील मामा वरेरकर नाटय़गृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळय़ात करण्यात येणार आहे. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ आयोजित पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे ९ मे रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील वीर सावरकर सभागृहात उद्घाटन होणार आहे. दर दिवशी तीन चित्रपट या महोत्सवातून दाखवले जाणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First konkan film festival konkan movies festival organizing ysh

ताज्या बातम्या