फ्लॅशबॅक : ‘बाहुबली’, डबिंग आणि दाक्षिणात्य चित्रपट

रजनीकांत व सिल्क स्मिता यांनाही तुम्ही पटकन ओळखले असले.

रजनीकांत आणि सिल्क स्मिता (चित्रपट – गलियों का गुंडा)

dilip thakurसोबतचे छायाचित्रच सांगतेय की ते तेलगु अथवा तमिळ चित्रपटातील आहे. अगदी रजनीकांत व सिल्क स्मिता यांनाही तुम्ही पटकन ओळखले असले. दोघेही आपल्या खास फिल्मी वैशिष्ट्यानुसार येथे दिसताहेत. पण मग हा चित्रपट कोणता? ‘बाहुबली’ने सध्या समाजजीवन व बॉक्स ऑफिस व्यापून टाकले असल्यानेच या चित्रपटाची आठवण आलीय. मूळचा तमिळ ‘बाहुबली’ हिंदीत डब झाल्याचे आज अजिबात गैर वाटत नसून तो जणू हिंदीच आहे, असे मानत त्याचे दोन्ही भाग खणखणीतपणे स्वीकारले गेले. पण पंचवीस तीस वर्षांपूर्वी असे होत नसे. हा चित्रपट डबच आहे हे त्याचे नाव, पोस्टर डिझाईन व प्रदर्शन अशा सर्वच बाबतीत घडे. तेव्हाच्या काळाचे तेच वैशिष्ट्य म्हणा ना? त्यातलाच हा ‘गलियों का गुंडा’. नाव अगदीच भडक वगैरे वाटत असेल तरी अशा भरभरून हाणामारीवाल्या चित्रपटाचा तेव्हा खास हुकमी क्राऊड होता. रजनीकांतच्या सर्वशक्तिमान साहसी हिकमती भूमिका त्यांना आवडत. अशा डब चित्रपटाचे मूळ नाव काय बरे याच्या फंदात कोणीच पडत नसत. अशा चित्रपटांच्या डबिंग व पोस्टरचा खर्च तेवढा करावा लागे. मुख्य प्रवाहातील एकपडदा चित्रपटगृहापेक्षा दुय्यम स्थानकावरील चित्रपटगृहात आणि व्हिडीओ थिएटरमधे हे ‘कलरफुल्ल’ चित्रपट झपाटल्यागत पाहिले जात. रजनीकांत ,कमल हसन, श्रीदेवी, जयाप्रदा यांचा हिंदीत चाहतावर्ग खूप. म्हणूनच तर या स्टारचे त्या काळात बरेचसे तेलगू तमिळ चित्रपट हिंदीत डब होऊन आले. आणि त्यांनी यशही बरे मिळवले. अगदी मणिरत्नमच्या ‘नायकन’चा फिरोज खानने ‘दयावान’ नावाने रिमेक केला व तो फसला. (कमल हसनच्या जागी विनोद खन्ना ही निवड वाईट नव्हती. पण दिग्दर्शन हाताळणी फसली) तरी काही काळानंतर ‘नायकन’ मूळ नावानेच डब होऊन प्रदर्शित झाला. तात्पर्य रिमेक व डब या संस्कृतीने एका भाषेतील चित्रपट व त्याचे विषय अन्यभाषेत जाण्याची सकारात्मक प्रक्रिया सुरु राहते. मग तो निर्माता दिनेश साल्गिया याचा भडक मनोरंजनाचा ‘गलियो का गुंडा’ का असेना? अशा अतिशयोक्तीपूर्ण मसाला चित्रपटाचाही प्रेक्षक आहे बरं का? हे छायाचित्र तेच तर सांगतेय. ‘बाहुबली’ येईपर्यंत डब चित्रपटाचे खास आकर्षण वाढलंय.
– दिलीप ठाकूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flashback by dilip thakur bahubali dubbing and south indian movies