चित्रपटाचा इतिहास म्हटलं की दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ (३ मे १९१३) पासून कोणते चित्रपट निर्माण झाले याची सूची, माहिती मिळते हा तसा नेहमीचाच अनुभव. पण याच चित्रपटाच्या इतिहासाला प्रेक्षकांच्या सहभाग व दृष्टिकोनातून मांडणे वेगळाच अनुभव ठरु शकतो ना? आणि तेच जर एखाद्या चित्रपटातून साकारले असेल तर?
निर्माता-दिग्दर्शक कृष्णा शहा याने ‘सिनेमा सिनेमा’ (१९७९)  या चित्रपटातून तसा केलेला प्रयत्न माहिती, मनोरंजन व प्रबोधन याचे उत्तम मिश्रण ठरले.
या चित्रपटाची कल्पना दुहेरी पण भन्नाट होती. धर्मेंद्र-हेमा मालिनी-अमिताभ बच्चन व झीनत अमान हे एकानंतर दुसरा अशा पध्दतीने अर्धा तास पडद्यावर येतात व चित्रपटाचा इतिहास सांगू लागतात. आता हेच सांगायचे तर त्याचा चित्रपट कसा होईल?  ते राष्ट्रीय दूरदर्शनवर दाखवता आले असते  ( तोपर्यंत आपल्याकडे दूरदर्शनची एकच वाहिनी होती) याच इतिहासाची प्रेक्षकांसह मांडणी केली तर? ‘येथेच दिग्दर्शक दिसतो.’ एका हाऊस फुल्ल  थिएटरमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहताहेत व त्यांच्यासमोर धर्मेंद्र इत्यादी इतिहास कथन करताना जुन्या काळातील चित्रपटातील दृश्ये येताहेत अशी मांडणी होती. हे विविध प्रकारचे प्रेक्षक असतात हे दाखवतच रंजक करण्यात आले. प्रेमी युगलापासून  ( मुश्ताक मर्चेंट व किम) श्रध्दाळू स्री प्रेक्षकांपर्यंत  (पौराणिक चित्रपटातील पडद्यावरील देव देवताना नमस्कार करते), फिल्मी डायलॉगसाठी पुन्हा पुन्हा तोच चित्रपट पाहणार्‍यापासून  ( राजकुमारची क्रेझ) घरी झोप येत नाही म्हणून थिएटरमध्ये येऊन मस्त झोप काढणार्‍यापर्यंत अनेक प्रकारचे प्रेक्षक असतात यावर हा चित्रपट ‘फोकस’ टाकतो. एखाद्या थिएटरमध्ये चित्रपटाचे रिळ तुटताच होणारा गोंधळ थांबवायचा हुकमी मार्ग म्हणजे पटकन ‘मेरे देश की धरती सोना उगले’ (उपकार)  गाणे दाखवावे. अशा अनेक छोट्या छोट्या संदर्भाने हा चित्रपट माहितीसह मस्तच मनोरंजन करतो. तो एकपडदा चित्रपटगृहाचा काळ होता. कष्टकरी, कामकरी, स्वप्नाळू प्रेक्षक चित्रपटगृहाच्या अंधारात सर्व दु:ख,  तणाव,  विवंचना कसा विसरतो हेच मोठे सत्य हा चित्रपट सांगतो. हाच खरा चित्रपटाच्या प्रेक्षकांचा इतिहास आहे. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितलीय,  चित्रपटगृहात सर्वधर्मसमभाव जपला जातो. सर्वच जाती-धर्माचे प्रेक्षक एकत्र येऊन चित्रपटाचा आनंद देतात हे चित्रपटाने देशाला दिलेले देणे आहे. दिग्दर्शक कृष्णा शाहने प्रेक्षकांच्या या सगळ्या सहभागाचे चित्रीकरण धोबीतलावच्या एडवर्ड चित्रपटगृहात केले.
अशा प्रकारचा चित्रपट हेदेखील वेगळेपण आहे. एव्हाना चित्रपटाचा प्रवाह बराच पुढे गेल्याने या चित्रपटाचा कोणी तरी सिक्वेल बनवायला काहीच हरकत नसावी…
दिलीप ठाकूर