रेडिओचा सुवर्णकाळ टीव्हीने संपवला. आता रेडिओयुग संपलं असं वाटत असतानाच एफएमच्या रूपात ते पुन्हा अवतरलं. रेडिओचं हे नवं रूप एकदम चटपटीत, तरुणाईच्या भाषेत यो म्हणावं असं..

कुठलीही प्रसारमाध्यमं असोत, ती आपल्याला जवळचीच वाटतात. उदाहरणच द्यायचं झालं तर टिव्हीमधल्या मालिका असोत, मोठय़ा पडद्यावर बघितलेले चित्रपट असोत किंवा स्टेजवर बघितलेले नाटकाचे शोज् असोत या सर्वाचा आपल्या मनावर कळत-नकळत परिणाम होत असतो. सतत या मालिका, चित्रपट, नाटक बघून, ऐकून त्यात काम करणारे कलाकार आपल्याला घरातले वाटायला लागतात. आपण त्यांना फक्त ऐकत नसतो तर बघतही असतो. आपण पूर्ण एकाग्र होऊन बघतो आणि ऐकतो. पण असं एक प्रसारमाध्यम आहे जे आपण इतर काही कामं करताना ऐकू शकतो. किंबहुना बरेचदा आपण तसंच करतो. ऑफिसमध्ये येता-जाता, प्रवासात, घरातली कामं करताना आपण बॅक्ग्राउंडमध्ये लावून ठेवतो. सध्या हे माध्यम तरुणांमध्येदेखील लोकप्रिय आहे. हे श्राव्य माध्यम म्हणजेच रेडिओ.

काही वर्षांपूर्वी रेडिओची क्रेझ होती. रेडिओच्या कार्यक्रमांची वेळ झाली की हात आपोआप रेडिओच्या बटणांकडे वळत. त्यानंतरच्या काळात दूरचित्रवाणी म्हणजे टीव्हीने बाजी मारली. हे स्थान टीव्हीने बराच काळ टिकवलं. मग आपला पेहराव बदललेला, आणखी सुंदर झालेला रेडिओ या स्पर्धेत नव्याने उतरला. पेहराव बदललेला म्हणजे नेमकं काय? तर नवनवीन रेडिओ स्टेशन्स उदयास येऊ लागली. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर होऊ लागले. सादरीकरणाची वेगळी पद्धत या खाजगी एफ एम स्टेशन्सनी जोपासली. रेडिओ स्टेशन्सची संख्या वाढल्याने एकमेकात स्पर्धा होऊ लागली. स्पर्धेमुळे प्रत्येक जण जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू लागला. या स्पर्धेमुळे रेडिओचं आधीपेक्षा खूप वेगळं असं रूप श्रोत्यांना अनुभवायला मिळालं.

खाजगी एफएममध्ये आर.जे. म्हणून येऊ पाहणाऱ्या मुलांना कुठले गुण आवश्यक आहेत यावर फिवर १०४ एफएमचे आर.जे. अनुराग पांडे म्हणतात, ‘कुठल्याही भाषेत तुम्ही कार्यक्रम सादर करा, पण सादरीकरणाची भाषा स्वच्छ, शुद्धच असली पाहिजे. श्रोत्यांशी चांगल्या प्रकारे संवाद साधता यायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आवाज चांगला हवा, माइकवरून चांगला यायला हवा.’

इथे आर.जे. म्हणून काम करायचं असेल तर लेखी परीक्षा द्यावी लागते. तसंच ऑडिशन (आवाजाची चाचणी) सुद्धा घेतली जाते. वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवर वेगवेगळ्या नावाने आर.जे. आळखले जातात. म्हणजे आर.जे. अनुराग पांडे चित्रपटांविषयी बोलतात तेव्हा ते पिक्चर पांडे असतात. पण प्रत्येक आर.जे. असं करतातच असं नाही. अनुराग पांडे म्हणतात, चांगले- वाईट अनुभव प्रत्येक क्षेत्रात येतात, तसे या क्षेत्रातही येतात, पण अशा परिस्थितीत आपल्याला समतोल राखता यायला हवा.

रेडिओचे कुठलेही कार्यक्रम करताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तांत्रिक बाबी. स्टूडिओतल्या सर्व सिस्टिम ऑटोमॅटिक असल्याने आर.जे. पूर्णपणे त्यावर अवलंबून असतात. गाणी लावणं, जाहिराती लावणं हे सर्व कोण बघतं याबद्दल ‘रेडिओ सिटी नाइन्टीवन पॉइंट वन’चे टकाटक मुंबई कार्यक्रम करणारे आर.जे. रोहित वीर म्हणाले की सर्व गाणी आणि जाहिराती कॉम्प्युटरवर फीड केलेल्या असतात. ही गाणी निवडण्याकरता एक रिसर्च टीम असते. या टीममध्ये पाच-सहाजणं असतात. ही टीम ठरवते की कुठल्या वेळी कुठली गाणी वाजतील. नॅशनल म्यूझिक हेड हे या टीमचे प्रमुख असतात. त्यांनी ठरवलेली गाणी मुंबई, पुणे आणि इतर रेडिओ सिटीच्या स्टेशनवर वाजतात. काही विशेष कार्यक्रम, मुलाखत असेल तर त्या व्यक्तींशी निगडित गाणी काढायला आम्ही त्या टीमला सांगतो. याव्यातिरिक्त गाण्यांविषयी आम्ही आर.जे. काही ठरवत नाही.  वेगवेगळी रेडिओ स्टेशन वेगवेगळ्या पद्धतीची गाणी निवडतात. जसं काही स्टेशनवर जुनीच गाणी वाजतात तर काहीवर नवीन आणि काहींवर जुनी आणि नवीन दोन्ही. रेडिओ सिटीवर दोन्ही प्रकारची गाणी लावतात.

गाण्यांच्या निवड करण्याच्या दृष्टीने दिवसाला तीन भागांत विभागतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. त्या त्या वेळेच्या वातावरणाला अनुरूप गाण्याची निवड केली जाते. सकाळी शांत, संथ, प्रसन्न गाणी असतात. दुपारचे कार्यक्रम बहुतेक महिला ऐकतात म्हणून त्यांच्यासाठी ऐंशी- नव्वदच्या दशकातील गाणी असतात आणि संध्याकाळी हल्लीची सुपरहिट गाणी. टकाटक मुंबई हा आर.जे. रोहित वीरचा कार्यक्रम संध्याकाळी पाच ते नऊ असतो. त्याच्या कार्यक्रमाचे श्रोते संध्याकाळी परतीला लागलेले असतात. अशा वेळेला श्रोत्यांना हल्लीची हिट गाणी ऐकायला आवडतात. दिवसभराचा थकवा दूर करायला ही गाणी ऊर्जा देतात. दिवाळीच्या वेळेला किंवा ख्रिसमसला जाहिरातींची संख्या खूप असते. मग अशा वेळी गाणी कमी लागतात.

दोन गाण्यांमध्ये एक ते दीड मिनिटे आर.जे. बोलू शकतो. अगदीच महत्त्वाचं काही असेल तर दोन मिनिटांपर्यंत बोलू शकतो. साधारण एका तासाला अकरा गाणी वाजतात. स्क्रिप्टिंगविषयी विचारलं असता आर.जे. रोहित वीर म्हणाले की मी अगदी नवीन असताना पूर्ण स्क्रिप्ट लिहायचो. त्यानंतर मुद्दे लिहून न्यायला लागलो. आता काय बोलायचं ते सगळं डोक्यातच असतं, काही लिहून नेण्याची गरज पडत नाही. कार्यक्रमाच्या तासभर आधी आमच्या कार्यक्रमाच्या प्रोडय़ुसरशी कार्यक्रमाविषयी चर्चा करतो. आर.जें.ना सामान्य ज्ञान असणंपण गरजेचं आहे. एखाद्याची मुलाखत घ्यायची असेल तर त्या व्यक्तीविषयी जुजबी माहिती तरी असायला हवी. त्यासाठी नियमित पेपर वाचावा. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी डोळे आणि कान उघडे ठेवून टिपल्या पाहिजेत. लोकांबाबत आपण संवेदनशील असायला हवं. आर.जे.चं काम हे आव्हानात्मक आहे. त्यात कलात्मकता असणंपण गरजेचं आहे.
काही रिक्वेस्ट शो असतात, काही कार्यक्रमांत प्रश्न विचारले जातात, त्याची बरोबर उत्तरं दिली की बक्षीस मिळतं याबद्दलचा अनुभव सांगताना रोहित वीर म्हणाले की बऱ्याचदा एकाच घरातले चार लोक वेगवेगळ्या नंबरवरून बक्षीस मिळवण्याकरता फोन करतात. मग यावर उपाय म्हणजे आमच्याकडे कॉलरची ब्लॅक लिस्ट आहे. त्यामुळे कॉलर आयडीवर आम्ही नंबर बघतो मग कळतं आम्हाला की हा कॉलर खरा आहे की परत परत बक्षिसासाठी फोन करतोय. यामुळे आम्ही फोनपेक्षा एसएमएसवर जास्तं विश्वास ठेवतो. रिक्वेस्ट शोमध्ये श्रोत्यांनी सांगितलेलं गाण लगेच कसं काय लावतात असा प्रश्न बहुतेक श्रोत्यांना पडला असेल. याचं उत्तर देताना रोहित वीर म्हणाले की कॉम्प्युटरवर गाण्यांची यादी तयार असते. त्या गाण्याचं नाव घातलं की ते गाणं कॉम्प्युटरवर मिळतं. दोन गाण्यांच्या मध्ये आम्ही फोन घेतो आणि तिथल्या तिथे एडिट करतो. लाइव्ह फोन शक्यतोवर घेत नाही.

दृक्श्राव्य माध्यमात मोडणाऱ्या सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी आपल्याला जवळीक वाटते, कारण ही मंडळी आपल्याला सतत दिसत असतात, पण गंमत म्हणजे रेडिओसारख्या श्राव्य माध्यमांत काम करणारे हे आर.जे.सुद्धा आपल्याला तितकेच आपलेसे वाटतात. याचं कारण म्हणजे आपल्याला भुरळ घालणारा त्यांचा आवाज आणि कार्यक्रम सादरीकरणाची त्यांची आगळी पद्धत. आणि हो, मोबाइलच्या माध्यमातून आपण त्यांना सतत आपल्या बरोबर ठेवू शकतो.
ग्रीष्मा जोग बेहेरे- response.lokprabha@expressindia.com