Mimi Chakraborty received rape threats: पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात निदर्शनं सुरू आहेत. डॉक्टर्स, सर्वसामान्य लोक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही आरोपीही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहे. या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्याने तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला (Mimi Chakraborty) बलात्काराच्या धमक्या येत आहेत.
९ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून या डॉक्टर तरुणीची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्याने बलात्काराच्या धमक्या येत आहेत, असं मिमीने म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचंही तिने सांगितलं. मिमी कोलकातामध्ये या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. तसेच तिने पोस्टही केल्या होत्या.
मिमी चक्रवर्तीची पोस्ट
मिमीने एक्सवर स्क्रीनशॉट शेअर करून लिहिलं, “आणि आम्ही महिलांसाठी न्याय मागतोय, हो ना? हे त्यापैकीच काही. महिलांच्या पाठीशी उभे आहोत असं सांगणाऱ्या गर्दीत मुखवटा घातलेल्या विषारी पुरुषांकडून बलात्काराच्या धमक्या सामान्य झाल्या आहेत. कोणते संस्कार आणि शिक्षण यास परवानगी देते?” असा सवाल मिमीने केला आहे. तिने या पोस्टमध्ये कोलकाता पोलिसांच्या सायबर सेल विभागाला टॅग केलं आहे.
कोलकात्यातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यपद्धती सुचवण्यासाठी त्यांच्या अधिकाराखाली राष्ट्रीय कार्य दलाची स्थापना केली आहे.
बदलापुरातील घटनेने तणावाचं वातावरण
कोलकात्यातील या प्रकरणाबद्दल संपूर्ण देशात संतापाची लाट असताना बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault Case) एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत मंगळवारी असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी शाळेची तोडफोड करत आंदोलन केलं, तसेच रेल्वे रोको आंदोलनही केलं. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे.