scorecardresearch

पठाण पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहून माजी न्यायाधीश भडकले, म्हणाले “हा देश आता वेड्यांचे…”

माजी न्यायाधीशांनी पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. पण तेच ट्रोल झाले.

markandey katju on pathaan movie
माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी पठान पाहण्यासाठी गेलेल्या लोकांवर टीका केली.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांचा बहुचर्चित पठाण (Pathaan Movie) चित्रपट आता प्रदर्शित झाला असून लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. एकाबाजूला अनेकजण चित्रपटाची प्रशंसा करत असताना या चित्रपटाच्या विरोधातही अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. आता या वादात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी देखील उडी घेतली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत. त्यांच्या पोस्टना ट्रोलर्स लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट करत काटजू यांनाच सल्ले दिले आहेत. पठाणच्या कमाईचे आकडे मात्र दिवसागणिक वाढत चालले असताना इतर लोकांनी निर्माण केलेल्या वादांमुळे चित्रपटाची जाहीरातच होत आहे.

माजी न्यायाधीश काटजू काय म्हणाले?

आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी काटजू प्रसिद्ध आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा जणू सपाटाच लावला होता. आता त्यांनी पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया देण्याची एक मालिकाच सुरु केली आहे. थोड्या वेळापूर्वीच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “पठाण चित्रपट पाहण्यासाठी जी गर्दी दिसतेय त्यावरुन मला वाटतंय की, हा देश आता वेड्यांचे रुग्णालय झालाय का? (हिंदी शब्द पागलखाना)” काटजू यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक पोस्ट टाकून अनेक लोकांना ब्लॉक करत असल्याचे म्हटले.

दोन दिवसांपूर्वी देखील काटजू यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले, “पठाण चित्रटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मला वाटतय की देशातील मुर्खांची संख्या वाढून आता ती ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात गेली आहे.” या पोस्टला देखील युजर्सनी ट्रोल केले होते. दोन्ही बाजूंच्या लोकांनी भरभरून कमेंट करत काटजू यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या.

युजर्स काय म्हणाले?

काटजू यांच्या पोस्टवर लोकांनी कमेंट करुन त्यांना ट्रोल केले आहे. इमरान नावाचा एक युजर म्हणतो, तुम्ही म्हणताय तसंच होतंय, खरे मुद्दे या चित्रपटाने लपवले आहेत. तर खूशबू नावाची युजर म्हणते, चित्रपटाला अशीच गर्दी वाढत राहिली तर फक्त तुम्ही आणि मी सोडून बाकी सर्व जनता वेडी होईल. तर सिद्धार्थ नावाचा एक युजर म्हणतो, आधी बायकॉटची धमकी देणारे वेडे झाले होते आणि आता चित्रपट पाहायला जाणारे वेडे झालेत. दोन्हीकडचे लोक अतिरेक करत आहेत.

हे वाचा >> शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर

पठाणची रेकॉर्ड ब्रेक कमाई

अनेक वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला Pathaan च्या माध्यमातून शाहरुख खानने चार वर्षांनतर सिनेसृष्टीत पुन्हा एकदा दमदार एंट्री घेतली आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५५ कोटींचा गल्ला कमावला असं चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी कमाई करणारा पठाण पहिलाच चित्रपट आहे. पठाणने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असून कन्नडच्या केजीएफ चित्रपटालाही मागे टाकल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:48 IST
ताज्या बातम्या