नव्वदीच्या काळातील वॉर्नर ब्रदर्सच्या फ्रेंड्स या मालिकेचे गारुड अद्यापही कमी झालेले नाही. काही काळ गेल्यानंतर सोशल मिडियावर पुन्हा पुन्हा येत असते की फ्रेंडसचे रिबूट होणार. फ्रेंड्स पुन्हा आपल्या भेटीसाठी नव्याने येणार परंतु हे केवळ अशक्य असल्याचे या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनने स्पष्ट केले आहे.

फ्रेंड्स संपून १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. फ्रेंड्सचे एकूण १० सीजन पूर्ण झाले होते. त्यानंतर ही मालिका बंद करण्यात आली होती. या मालिकेची लोकप्रियता केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतातही ही होती. अनेक युरोपीय भाषांमध्ये अनुवादित करुन किंवा सब-टायटल देऊन हा कार्यक्रम प्रसारित केला जात असे.

त्यामुळेच या मालिकेचे रिबूट व्हावे अशी इच्छा या कार्यक्रमाच्या चाहत्यांनी नेहमी असायची. काही दिवसांपूर्वी या मालिकेत काम केलेल्या कलाकारांचे रियुनियन झाले होते. त्यामुळे हा शो पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल याची चर्चा सुरू झाली. परंतु, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे की तुमचा आवडता शो परत कधी तुमच्या भेटीसाठी येणार नाही.

या कार्यक्रमात रेचेलची भूमिका वठविणारी जेनिफरने त्याचे कारण एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. या शोची रचना त्या काळानुरुप होती. हा शो त्या काळात तयार करण्यात आला होता जेव्हा मोबाईल, सोशल मिडिया, चॅटिंग या गोष्टींची क्रांती झालेली नव्हती. त्यामुळे सर्व मित्र मैत्रीण एकत्र येऊन कॅफेमध्ये बसून गप्पा मारणे हा या शोचा आत्मा होता. आता काळ बदलला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि चॅटिंगमुळे आपण या सर्व गोष्टी गमावल्या आहेत. तेव्हा आताच्या काळात हा शो बनवणे कठीण असल्याचे तिने म्हटले.

अजूनही फ्रेंड्सचे पुनःप्रसारण वॉर्नर ब्रदर्सवर होत असते तर डी. व्ही. डी किंवा ब्लू रे डिस्कच्या माध्यमातून चाहते या शोचा स्वाद वारंवार घेत असतात. हा शो म्हणजे चाहत्यांसाठी कम्फर्ट फूड असल्याची भावना तिने व्यक्त केली. जेव्हा चाहत्यांना काही नकारात्मक विचार येतात किंवा तणाव असह्य होतो तेव्हा तो घालविण्यासाठी चाहते फ्रेंड्सचा एखादा एपिसोड पाहतात.

हीच या शो ची जमेची बाजू आहे. त्यामुळे पुन्हा याच प्रकारची गुणवत्ता देणे ही आव्हानात्मक ठरेल असे तिने म्हटले. या शोची निर्माती मार्टा कॉफमन हीने देखील या आधीच स्पष्ट केले होते की फ्रेंड्सचा सिक्वेल करण्याची अपेक्षा सोडून दिली पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले होते.
फ्रेंड्स हे निश्चितपणे नॉस्टॅलजिक आहे परंतु माझ्या नजरा आता भविष्याकडे आहेत असे जेनिफरने या मुलाखतीच्या शेवटी म्हटले.