scorecardresearch

Friendship day 2018: फिल्मी जग, खरी दोस्ती…

राजेश खन्नाची किशोरकुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन या दोघांशीही असलेली मैत्री कायमच कौतुकास्पद राहिली.

Friendship day 2018
मराठी चित्रपटसृष्टीत पूर्वी कौटुंबिक आणि खेळीमेळीचे वातावरण होते हे तेव्हा प्रत्यक्ष सेटवर गेल्यावर पटकन लक्षात येई.
Friendship day 2018. ‘वहिदाजी, आशाजी, शम्मीजी आन्टीजी, हेलनजी या एकेकाळी चित्रपटात भूमिका करतानाही एकमेकांच्या छान मैत्रीणी होत्या, आणि आजही म्हणजे आज त्या चित्रपटात भूमिका करीत नसतानाही एकमेकींच्या संपर्कात आहेत, आजच्या पिढीतील अभिनेत्रींनी या अभिनेत्रींच्या मैत्रीचा आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही, हे कोण म्हणतो माहित आहे? हे सलमान खानचे बोल आहेत. आशा पारेखच्या पुस्तकाचे प्रकाशन करतानाच्या आपल्या छोट्याशा भाषणात सलमानने ही खूप मोठी गोष्ट सांगितली आणि आम्ही सगळे उपस्थित टाळी वाजवत छान हसलोही….

चित्रपटसृष्टीत मैत्री ही बरीचशी दुर्मिळच गोष्ट. अर्थात आपण स्टार्सचा विचार करतोय. मराठी चित्रपटसृष्टीत पूर्वी कौटुंबिक आणि खेळीमेळीचे वातावरण होते हे तेव्हा प्रत्यक्ष सेटवर गेल्यावर पटकन लक्षात येई. आजच्या स्पर्धेच्या आणि गतिमान युगात मैत्रीला वेळ तो कधी मिळणार हा कदाचित प्रश्न असू शकतो.

हिंदी चित्रपटसृष्टी तर अधिकच व्यावसायिक आणि व्यवहारी. मलाच पुढे जायचेय ही तेथील भावना म्हणजे त्या क्षेत्राचा स्वभाव. त्यातही तेथे निखळ मैत्रीपेक्षा प्रेम प्रकरणानी जणू इतिहास रचला. मैत्रीपेक्षाही तेथे इश्कासाठी वातावरण पूरक असावे. ऐवीतेवी हिंदी चित्रपटात ‘दोस्ती ‘पेक्षाही ‘लव्ह स्टोरी ‘ज फारच जास्त प्रमाणात निर्माण झाल्यात.

वाचा : Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

राज कपूर आणि राजेन्द्र कुमार तसेच राजेन्द्र कुमार आणि सुनील दत्त यांच्या मैत्रीचे पूर्वीपासून गोडवे गायले जात आहेत. ‘मदर इंडिया ‘मध्ये राजेन्द्र कुमार आणि सुनील दत्त यांनी भिन्न स्वभाव आणि वृत्तीचे सख्खे भाऊ साकारले तेव्हाच त्यांची मैत्रीही झाली. तर दिलीपकुमारने ‘संगम ‘मध्ये भूमिका साकारावी म्हणून राज कपूरने केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने राजेन्द्र कुमारने त्या भूमिकेसाठी आणि मैत्रीसाठी हात पुढे केला. कालांतराने या प्रत्येकाची मुले मोठी झाली आणि ही मैत्रीही घट्ट झाली. राज कपूरची मुलगी राजेन्द्र कुमारची सून होणार हे त्यांचा साखरपुडा झाल्याने स्पष्ट झाले, पण काही कारणांमुळे तसे होऊ न शकल्याने सुनील दत्तची मुलगी नम्रता हिचा कुमार गौरवशी विवाह झाला आणि ही मैत्री नवीन नात्यात परावर्तित झाली. राजेन्द्र कुमारच्या पाली हिल येथील बंगल्यातच असलेल्या डिंपल प्रिव्ह्यू थिएटरमध्ये अनेकदा तरी नवीन चित्रपटाच्या ट्रायल पाहायला जाण्याचा योग येई, तेव्हा तेथील भल्या मोठ्या फोटोंमध्ये या मैत्रीचे प्रतिबिंब पडलेले दिसे. संजय दत्तला बाँम्बस्फोट प्रकरणी अटक झाली आणि त्यानंतरच्या अनेक घडामोडीत आणि सुनील दत्तच्या लोकसभा निवडणूक प्रचारात अनेकदा तरी राजेन्द्र कुमार दत्तसाहेबांसोबत दिसे. चित्रपटसृष्टीतील दोस्तीचे हे उत्तम उदाहरण आहे.

राजेश खन्नाची किशोरकुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन या दोघांशीही असलेली मैत्री कायमच कौतुकास्पद राहिली. याचे कारण राजेश खन्ना कायमच आत्मकेंद्रीत आणि स्वतःवरच भरभरून प्रेम करणारा म्हणून ओळखला जाई आणि किशोर कुमार तर कायमच लहरी म्हणून परिचित. पण या स्टार्सच्या प्रतिमेपेक्षाही ते माणूस म्हणून अनेकदा वेगळे असतात. राजेश खन्नाने आशीर्वाद फिल्म या नावाची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि आपला पहिला चित्रपट ‘अलग अलग ‘ या चित्रपटाचा एस.एल. स्टुडिओत आपली मुलगी ट्विंकलच्या हस्ते मुहूर्त आयोजित केला तेव्हाची आठवण सांगायलाच हवी. दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी राजेश खन्ना व टीना मुनिमवर मुहूर्त दृश्य चित्रित केल्यानंतर काही वेळाने राजेश खन्नाने आम्हा सिनेपत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी जेव्हा चित्रपट निर्माता होईन तेव्हा माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझे मित्र किशोर कुमार आणि आर. डी. बर्मन एक गाणे फुकट देणार आहेत…. राजेशने तेव्हा जे सांगितले ते गाणे मग तयार झाले, नही जीना नही जीना, तेरे बिन नही जीना….

अशीच भारी आणि बहुचर्चित दीर्घकालीन मैत्री म्हणजे जीतेंद्र, राकेश रोशन आणि रिशी कपूर याची. या तिघांतील कधी हे तिघेही तर कधी कोणी दोघे एकत्र असलेले चित्रपट अनेक आहेत. राकेश रोशनने ‘खुदगर्ज ‘च्या वेळी दिग्दर्शनात पाऊल टाकले त्या चित्रपटात जीतू आणि रिशी एकत्र आलेत. याला मैत्री म्हणतात. पण हे एवढ्यावरच न थांबता आणखी काही गोष्टी सांगायला हव्यात. ‘कहो ना प्यार है ‘च्या ध्वनिफितीचे अंधेरीतील द क्लब येथील प्रकाशन आणि ह्रतिक रोशनला आशीर्वाद द्यायला हे दोघेही मैत्रीला जागून आले. विशेष म्हणजे हे तिघेही अनेक वर्षे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट करतात आणि ती गोष्ट कायमच चर्चेत असते, ती म्हणजे शनिवारी रात्री ते सोमवार सकाळ या वेळी हे तिघेही जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र येऊन धमाल करतात अर्थात आठवडाभरचा शीण हलका करण्यासाठी ते भेटतात आणि नवीन उर्जा घेत घरी जातात. यांचा आणखी एक मित्र होता, तो म्हणजे विनोद मेहरा. तो या प्रत्येकासोबत कोणत्या ना कोणत्या चित्रपटात असणारच हे ठरुन गेलेले होते. विशेष म्हणजे फार पूर्वी जितेंद्र आणि विनोद मेहरा पाली हिलवरील निभाना या एकाच इमारतीत राहत.

चित्रपटसृष्टीतील मैत्रीत अभिषेक बच्चन आणि गोल्डी बहेल (सोनाली बेंद्रेचा पती) हे एक मैत्रीचे उदाहरण आहे. अभिषेकच्या लग्नात सोनालीचा म्हणूनच विशेष पुढाकार होता आणि सोनालीकडून या मैत्रीचे काही किस्सेही समजले.
पण एकूणच चित्रपटसृष्टीत बड्या स्टार्सच्या निखळ आणि मोकळ्या मैत्रीची उदाहरणे कमीच. एक तर प्रत्येकाला पुढे जायचेय आणि मैत्री करायची असेल तर वेळ आणि गुपितं द्यायला /घ्यायला हवीत. त्यापेक्षा ‘आमची व्यावसायिक मैत्री आहे ‘असे म्हणणे एकमेकांच्या सोयीचे! त्यात आपल्या मनातील आपल्याच मनात राहते आणि एकमेकांना स्पेस देता येते. मैत्री झाली म्हणजे आता अधिकार गाजवूया हे चित्रपटाच्या जगात शक्य नाही. कधी आपण नाकारलेला चित्रपट नेमका आपल्याच मित्राने स्वीकारल्याचे दुःख तरी पदरी येत नाही. येथे अनेकदा तरी चित्रपटाच्या यशापयशासह नाती बदलतात, निर्माण होतात, अभिनयासाठी चेहर्‍याला रंग लावता लावता खरा चेहरा हरवून जातो, मैत्री तर खऱ्या चेहर्‍याशी होते /होऊ शकते. चित्रपट सुपरहिट झाला रे झाला येथे केवढे तरी मित्र होतात /भेटतात. महत्त्वाचे म्हणजे शूटिंग /डबिंग /नृत्य रिहर्सल /विदेश दौरे /इव्हेंट /सुपारी /मिडिया संवाद /खरेदी /पार्ट्या असे खच्चून भरलेल्या फिल्मी आयुष्यात घरासाठी वेळ नाही तर तो मैत्रीसाठी कसा असणार?

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friendship day 2018 bollywood celebrities friendship and much more

ताज्या बातम्या