श्रीदेवीच्या सावलीला बॉलिवूडमध्ये असं मिळालं ‘ग्रँड वेलकम’

जान्हवी आणि संपूर्ण कपूर कुटुंबासाठी हा दिवस खास ठरला.

ishaan khatter, janhavi kapoor
इशान खट्टर, जान्हवी कपूर
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धडक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे जान्हवी आणि संपूर्ण कपूर कुटुंबासाठी हा दिवस खास ठरला. आईच्या आठवणीने यावेळी जान्हवीच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. पण जान्हवीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं बॉलिवूडने दाखवून दिलं. बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जान्हवीला शुभेच्छा दिल्या आणि इंडस्ट्रीमध्ये पहिलं पाऊल ठेवताना तिचं ग्रँड वेलकमदेखील केलं.

सोशल मीडियावर सध्या ‘धडक’चीच चर्चा पाहायला मिळतेय. सोमवारी सकाळपासूनच धडक आणि जान्हवीचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड झाला. अनिल कपूर, आलिया भट्ट, गौरी शिंदे, वरूण धवन, नेहा धुपिया अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी जान्हवीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

शशांक खैतान दिग्दर्शित हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये जान्हवी आणि इशान खट्टरसोबतच ऐश्वर्या नारकर, आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर ‘सैराट’मधल्या संगीताची जादू ‘धडक’मध्येही पाहायला मिळते. हिंदी ‘झिंगाट’ गाण्यावर जान्हवी आणि इशान थिरकताना या ट्रेलरमध्ये दिसतात. त्यामुळे आता ‘सैराट’प्रमाणेच हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना याड लावेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: From alia bhatt to anil kapoor bollywood gives a shout out to janhvi kapoor dhadak trailer