रेश्मा राईकवार
एखाद्या व्यावसायिक चित्रपटाचा कथाविषय किमान काही चांगला वाटला तरी त्याकडून फारशी अपेक्षा ठेवणं हा कायमच पदरी निराशा पाडून जाणारा अनुभव असतो. मोठय़ा चित्रपटांना दिलं जाणारं वलय, त्यातले मोठे कलाकार, नाच-गाणी या सगळय़ात कितीही चांगले विषय असले तरी ते वाहून जातात. आणि आम्ही काही बरं करण्याचा प्रयत्न करतो आहोत हा त्यांचा आवही शोभा करून जाणाराच असतो, याची प्रचीती पुन्हा एकवार राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जियो या चित्रपटाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुग जुग जियो हा म्हटलं तर अगदी तद्दन मसालापट नाही आणि असा दावा करणं धाष्र्टय़ाचं ठरेल एवढा मसाला त्यात ठासून भरलेलाही आहे. थोडक्यात विषय चांगला आहे, मांडणी संतुलित करण्याचा काहीसा प्रयत्न होताना दिसतो, पण मग त्याला नेहमीच्या चकचकीत गोष्टी फासल्या जातात आणि सारा खेळ फसतो. शाळकरी वयात प्रेमात पडलेले कुक्कू आणि नैना यांची यात गोष्ट आहे. आणि पुढे त्यात कुक्कूच्या आई-वडिलांचीही गोष्ट आहे. शाळेपासून सुरू झालेली प्रेमकथा, तरुणपणी बहरत जाते. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर रीतसर आणि लगोलग ते लग्नही करतात. आणि आपल्याला पाच वर्षांनी कॅनडात एकमेकांपासून तोंड फिरवून वावरणारे तरीही एकत्र राहणारे कुक्कू आणि नैना पाहायला मिळतात. प्रेमाचे गुलाबी दिवस नाही इथे यांच्याबाबतीत वर्षे म्हणता येतील ते संपल्यानंतर त्यांचे स्वभाव, त्यांचे अहंकार, त्यांच्या कामाच्या वेळा – दर्जा अशा सगळय़ाच गोष्टींमुळे फाटाफूट पडलेली असते. हे अंतर सांधता येणार नाही, यावर ठाम असलेल्या या दोघांना कुक्कूच्या बहिणीच्या लग्नासाठी भारतात यावं लागतं. लग्न होईपर्यंत तरी आपण घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे, याची कुणकुण कोणाला लागू द्यायची नाही यासाठी धडपडणाऱ्या कुक्कूला तिथे गेल्यावर आणखी एका भलत्याच होऊ घातलेल्या घटस्फोटाचा सामना करावा लागतो. आपलं सावरू की त्यांना आवरू अशा विचित्र गोंधळात अडकलेल्या कुक्कू आणि नैनाला याच गोंधळात नाती नव्याने आकळत जातात. त्याची परिणती त्यांना पुन्हा आपलं नातं सापडण्यात होते की नाही या सगळय़ाचं उत्तर चित्रपट देतो. पण ज्यांची गोष्ट चित्रपट सुरू करतो ती पुढे त्यांची न राहता एका भलत्याच वळणावर पती, पत्नी और वो या छापाची होते. आणि मग साराच मामला बिघडत जातो.

प्रेम म्हणजे काय?, हे कळायचं वय नसताना उमललेलं प्रेम ते एकूणच आयुष्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल स्पष्टता आल्यानंतर झालेला खेळखंडोबा हे या कथेचं मुख्य सूत्र होतं. ते त्याच विषयाशी प्रामाणिक राहतं तर काही प्रमाणात का होईना चित्रपट एक वेगळेपणा नक्कीच देऊ शकला असता. अनुराग सिन्हा यांनी लिहिलेल्या कथेवर खरं तर आणखी तीन लेखकांनी काम करून त्याला पटकथेत बांधलं आहे. त्याचा काहीएक परिणाम कथामांडणीवर झाला आहे, त्यामुळे अगदी चौकटीतली प्रेमकथा न राहता काही प्रमाणात चित्रपट कौटुंबिक मूल्ये, पती-पत्नी यांच्यातील प्रेम-आदराचं नातं याबदद्ल बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा प्रयत्न अगदीच तुकडय़ा-तुकडय़ांतला आणि तोकडा आहे. पुन्हा ही सगळी एका सुखी कुटुंबाची गोष्ट असल्याने इतर गोष्टींचा फारसा विचार करण्याची गरज लेखक – दिग्दर्शकाला पडत नाही. किंबहुना अशा कुटुंबातील सदस्यांना प्रेम – लग्न या विषयात असे गोंधळ घालण्याची पुरेपूर परवानगी असते. त्यामुळे त्यांच्या जगण्यावर वा उदरनिर्वाहावर ना प्रश्नचिन्ह उमटणार असतं. किंवा त्यासाठी काही झगडावं लागणार असतं. त्यामुळे उरतो तो फक्त मानसिक पातळीवरचा गोंधळ.. किमान तेवढा तरी लेखनात एकसंधपणे दर्जेदार उतरायला हरकत नव्हती. जे कथेत नाही ते पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राज मेहता यांनी तरी का करावा? त्यातल्या त्यात पहिली जोडी अवघ्या काही मिनिटांत लग्नापासून घटस्फोटापर्यंत येते, यासाठीही त्यांचे आभारच मानायला हवेत.

या चित्रपटाचा विषय वर म्हटल्याप्रमाणे चांगला होता. त्यातल्या त्यात चांगली म्हणता येईल अशी आणखी एक गोष्ट म्हणून चित्रपटाच्या दोन वेगवेगळय़ा पिढीतील नायिकांच्या व्यक्तिरेखांची मांडणी. सासू आणि सुना या नात्यातून वागताना मुळात त्या दोघी एकमेकींचा स्त्री म्हणून विचार करताना दिसतात. या दोघींमधील एक खूप चांगला प्रसंग चित्रपटात आहे. मुळात हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनचा असल्याने अशा चकचकीत कौटुंबिक मूल्ये असलेल्या चित्रपटांमध्ये काळानुसार जेव्हा अशा शहाणकथा पाहायला मिळतात तेव्हा काहीसा अचंबा वाटणं हे साहजिक आहे. यात नीतू कपूर यांच्या वाटय़ाला आलेली आईची भूमिका त्यांनी खूप ताकदीने निभावली आहे. कमीत कमी संवाद आणि एकूण देहबोलीतून त्यांनी पत्नी आणि आईच्या छटा साकारल्या आहेत. मात्र अनिल कपूर यांची पत्नी म्हणून नीतू यांना स्वीकारणे अंमळ जड जाते. या दोघांच्या वयातला फरक पडद्यावर ठळकपणे जाणवतो. कियारा अडवाणीच्या वाटय़ाला एखाददुसरा प्रसंग वगळता फार काही चांगले नाही. अनम्लि कपूर आणि वरूण धवण त्यांच्या त्याच पठडीबाज पध्दतीने आपापल्या भूमिका पार पाडतात. संगीताच्या बाबतीतही चित्रपट निराशाच करतो. प्रेमकथाही नावालाच आहे आणि त्याला दिलेली शहाणकथेची जोडही तोंडी लावण्यापुरतीच.. बाकी असे मसालेदार चित्रपट कायमच बॉलीवूडमध्ये जुग जुग जियोह्णचा आशीर्वाद घेऊन आले आहेत, त्याला आपलाही पर्याय नाही.

जुग जुग जियो
दिग्दर्शक – राज मेहता
कलाकार – वरूण धवण, किराया अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल, टिस्का चोप्रा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Game commercial film artists movies directed entertainment amy
First published on: 26-06-2022 at 00:01 IST