सर्वसामान्य माणसांप्रमाणेच बॉलिवूडचे स्टारही भविष्यावर आणि नशिबावर विश्वास ठेवणारे असतात. एखादा ठोकळेबाजही ‘हिरो’म्हणून भाव खाऊन जातो. तर अभिनय चांगला असूनही नशिबाने साथ न दिल्याने अनेकांवर ‘पडेल’ असा शिक्का बसतो. बॉलिवूडमधील नशिबाचा हा खेळ फासे पडल्यानंतरच लक्षात येतो. चित्रपटातील एखादी भूमिका अगोदर एका कलाकाराला ‘ऑफर’ झालेली असते पण त्याने ती नाकारल्यानंतर अन्य कलाकाराच्या वाटय़ाला येते आणि त्याचे नशीब बदलून जाते.
बॉलिवूडमध्ये नशिबाच्या या खेळाचे ठळक उदाहरण आहे बॉलिवूडचा शहेनशहा ‘बिग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन याचे. सुरुवातीचे चित्रपट फारसे चालले नसल्याने अमिताभचा खेळ संपला असे सगळे म्हणत असताना ‘जंजीर’ने त्याला ‘अॅंग्री यंग मॅन’च्या प्रतिमेत घट्ट बसविले आणि अमिताभने मागे वळून पाहिलेच नाही. पण नशिबाचा खेळ म्हणजे अमिताभच्या या भूमिकेसाठी अगोदर राजकुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि देव आनंद यांना विचारण्यात आले होते. मात्र त्या दिग्गजांनी नकार दिल्याने ही भूमिका अमिताभला मिळाली आणि नवा इतिहास घडला.
यश चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘डर’ या चित्रपटासाठी आधी आमिर खानला विचारणा करण्यात आली होती. पण त्याने नकार दिल्यानंतर ही भूमिका शाहरुख खानकडे गेली आणि हा चित्रपट शाहरुखसाठी ‘लकी’ ठरला. चित्रपट आणि शाहरुख दोघेही गाजले. महेश मांजरेकर याच्या ‘अस्तित्व’ या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितला विचारले होते. तिने चित्रपट नाकारल्यानंतर अभिनेत्री तब्बूकडे चित्रपट आला. ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपटही खूप गाजला. पण चित्रपटातील दुसऱ्या नायिकेसाठी आघाडीची अभिनेत्री मिळत नव्हती. शेवटी चित्रपटातील ‘टिना’ही भूमिका अभिनेत्री राणी मुखर्जीला मिळाली आणि तिच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. ‘बाजीगर’ या चित्रपटाने शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘स्टार’ बनविले. पण शाहरूखच्या अगोदर या भूमिकेसाठी सलमान खान, अक्षय कुमार, अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. त्यांचा नकार शाहरुखच्या पथ्यावर पडला.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2014 रोजी प्रकाशित
एकाचा नकार दुसऱ्याच्या पथ्यावर
सर्वसामान्य माणसांप्रमाणेच बॉलिवूडचे स्टारही भविष्यावर आणि नशिबावर विश्वास ठेवणारे असतात. एखादा ठोकळेबाजही ‘हिरो’म्हणून भाव खाऊन जातो.

First published on: 08-05-2014 at 06:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Game of fate in bollywood