मराठी भाषेला प्राप्त झालेला ‘अभिजात भाषा’ हा बहुमान आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून गुरू एस. नायर यांच्या प्रॉडक्शनतर्फे ‘गौरव माय मराठीचा’ हे भव्य गीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गुरू एस. नायर यांनीच या गीताचे दिग्दर्शनही केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात सक्रिय असलेले आणि अनेक नामवंत कलावंतांचे यशस्वी स्टेज शो आयोजित करणारे गुरू नायर यांनी मराठी भाषेच्या प्रेमापोटी या गीताची निर्मिती केली आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली परंपरा आणि भाषेचा गौरव मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.
हे गीत बालकलाकार कुमार आदित्य जी. नायर आणि कोरस यांनी गायले असून, मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे दर्शन यातून घडणार आहे. गायक कुमार आदित्य जी. नायर याने अत्यंत कमी वयात आपल्या गायकीची मोहोर उमटवली आहे. त्याने यापूर्वी कविता पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, नागेश मोरवेकर आणि अभिजीत सावंत यांसारख्या दिग्गज गायकांसोबत गाणी गायली आहेत. आता ‘गौरव माय मराठीचा’ या गाण्यातून तो पुन्हा एकदा आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.
या गीताचे शब्द आणि संगीत किशोर मोहिते (वादक, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम) यांचे आहे. तर संगीताची अधिक रंगत वाढवण्याचे काम संगीत संयोजक सुदेश गायकवाड यांनी केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण गीताचे दिग्दर्शन स्वतः गुरू एस. नायर यांनी केले आहे. मराठी भाषेचा आदर वाढावा आणि भाषेची महती सर्वांपर्यंत पोहोचावी, या सामाजिक भावनेतून निर्माण केलेले हे गीत आदित्य नायर यांच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. मराठी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या या गीताला सर्व मराठी प्रेमींकडून उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा निर्माते गुरू नायर यांनी व्यक्त केली आहे.
