बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. आर्यनच्या अटकेमुळे खान कुटुंबियांमध्ये तसेच मन्नत बंगल्यामध्येही तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची पत्नी आणि आर्यनची आई गौरी खान हिने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला आहे. तसेच जोपर्यंत आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत घरात कोणताही गोड पदार्थ करायचा नाही, असे आदेश तिने घरातील कूकला दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्री, दसरा या निमित्त ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण असले तरीही मन्नतमध्ये मात्र कोणतेही सेलिब्रेशन यंदा करण्यात आलेले नाही. आर्यनच्या अटकेनंतर मन्नतमध्ये एकंदरीतच शांतता पसरली आहे. त्यामुळे सध्या शाहरुख आणि गौरी कोणत्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाहीत. विशेष म्हणजे नवरात्री दरम्यान गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला होता.

“त्यासोबतच जोपर्यंत आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारचे गोड पदार्थ केले जाणार नाही, असे स्पष्ट आदेश गौरीने घरातील सर्व नोकरांना खास दिले आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या घरातील एक नोकर हा खीर बनवत होता. मात्र त्यावेळी तिने त्याला खीर बनवू नकोस, असे सांगितले. यानंतर त्याला तात्काळ थांबायला सांगितलं. तसेच यापुढे घरात गोडधोड बनवायचे नाही,” असेही आदेश तिने दिले.

गौरी आणि शाहरुखला अश्रू अनावर

दरम्यान, अटक झाल्यानंतर जवळपास १२ दिवसांनंतर आर्यनने आई गौरी आणि शाहरुखशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुखला अश्रू अनावर झाले. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आर्यनने त्याच्या आईचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. जवळपास १० मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. दरम्यान आर्यनला पाहून गौरी खानला रडू कोसळले आहे.’ आर्थर रोड जेलमध्ये व्हिडीओ कॉल ही सुविधा करोना काळात सुरु झाली आहे. यामुळे कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांशी संवाद साधता येईल. याच सुविधेद्वारे आर्यनने आई आणि वडिलांशी संपर्क साधला.