Gautami Patil Monsoon Reel: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित असतात. गौतमी ही तिच्या अदांनी आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ करते. लोककलाविश्वातून लोकप्रिय झालेल्या गौतमीने आता चित्रपट आणि म्युझिक अल्बमच्या माध्यमातून सिनेविश्वातही ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असून कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच तिने पावसाळ्यातील एक सुंदर रील सोशल मीडियावर शेअर केली असून त्यामध्ये ती डोंगरमाथ्यावर गुरे राखताना आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.

सध्या राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वत्र हिरवागार निसर्ग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि पावसाच्या सरींमुळे निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. अशाच रम्य वातावरणात गौतमी पाटीलने पावसाचा आनंद घेतला आहे. डोंगराळ परिसरात गौतमीने पावसाचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या रीलमध्ये सर्वत्र हिरवाईचे दृश्य दिसत आहे. केस मोकळे सोडून पावसामध्ये भिजण्याचा गौतमीने मुक्तपणे आनंद घेतला आहे.

गौतमीने गुरे राखण्याचा घेतला अनुभव

या खास व्हिडीओमध्ये गौतमीने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला असून केस मोकळे सोडले आहेत. तिचा साधा पण मनमोहक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पावसाच्या सरींमध्ये ती डोंगराच्या पायथ्याशी चरणाऱ्या बकऱ्या आणि मेंढ्यांमध्ये रमलेली दिसते. एका लहानशा कोकराला तिने प्रेमाने उचलून कडेवर घेतल्याचे दृश्य अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. प्राण्यांविषयीचा तिचा जिव्हाळा आणि साधेपणा या व्हिडीओतून लक्षात येत आहे. गौतमीच्या मागे गावातील लोक हे गुरांना चरण्यासाठी घेऊन आल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासह काही वेळ घालवत गौतमीनेही गुरे राखण्याचा अनुभव घेतला. ग्लॅमरस जीवनशैलीपासून लांब जात तिने ग्रामीण संस्कृतीचा आनंद घेतला आहे.

गौतमीने या रीलला ‘चिंब भिजलेले’ हे ‘रूप सजलेले’ चित्रपटातील लोकप्रिय गीत पार्श्वसंगीत म्हणून वापरले आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या आवाजात सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. ‘पाऊस’ असे साधे कॅप्शन लिहित तिने छत्री आणि रेड हार्ट इमोजीसह हा व्हिडीओ शेअर केला आहे. गौतमीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

गौतमीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर व्हिडीओ आहे”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “रॉयल शेतकरी”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. गौतमी पाटीलच्या अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

सिनेविश्वामध्ये गौतमी पाटीलची वाढती लोकप्रियता

नृत्यांगना गौतमी पाटील ही नुकतीच लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांच्यासह डान्स करताना दिसली होती. दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटात “हिल हिल पोरी हिला…” हे गाणं होतं; या ५२ वर्षांपूर्वीच्या गाण्याचं एक नवीन व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील व भाऊ कदम यांची जोडी झळकली आहे. त्याचबरोबर ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटामध्येही गौतमी पाटील झळकली आहे.