Gautami Patil on Ajit Pawar: गौतमी पाटील तिच्या डान्स शोजमुळे अनेकदा चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. आजपर्यंत महाराष्ट्रातील गावोगावी तिचे डान्सचे कार्यक्रम पार पडले आहेत. अनेकजण तिचे कौतुक करतात.तर बऱ्याचदा गौतमीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. गौतमीला तिच्या डान्सच्या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. ती टीव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील शिट्टी वाजरी रे या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. याबरोबरच, ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली आहे.

गौतमी पाटीलने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल वक्तव्य केले. आईच्या पाठिंब्याबद्दल, तिच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल तिने वक्तव्य केले. तसेच, तिने दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले.

“दादांच्या बाबतीत माझ्या मनात एक…”

गौतमी पाटीलने नुकतीच लोकशाही फ्रेंडली या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “दादांच्या बाबतीत माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे. त्यांची मी नेहमी आभारी असेन.”

तिला विचारले की तू त्यांना कधी भेटलीस का? यावर गौतमी म्हणाली, “मी दादांना कधीच भेटले नाही. उलट मला भेटण्याची इच्छा होती. पण, ते शक्य झालं नाही. नकळत आपल्याला एखाद्याचा पाठिंबा मिळतो, तसे दादांचे दोन शब्द माझ्यासाठी खूप चांगले ठरले आहे. त्यामुळे मी अजून पुढे जाऊ शकले, असं मला वाटतं”, असे म्हणत गौतमीने अजित दादांबद्दल वक्तव्य केले. तसेच, त्यांनी भेटू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे.

गौतमी पाटीलने पुण्यातील एका कार्यक्रमात बैलांसमोर डान्स केला होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणालेले की, तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय? ते त्यांच्या भाषणात असेही म्हणालेले की ती बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेचे साधन देखील आहे. कला आणि अभिनयाचे माध्यम म्हणून ती त्याकडे पाहते.

दरम्यान, अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ ला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले.