Gautami Patil on Radha Patil : गौतमी पाटील हे नाव आता काही नवीन नाही. ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ म्हणून ती महाराष्ट्रात लोकप्रिय आहे आणि तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. गौतमीचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही, असं होत नाही. डान्सप्रमाणेच गौतमी अनेकदा वादामुळेही चर्चेत राहिली आहे.
गौतमी पाटीलनंतर आणखी एक डान्सर तरुणाईमध्ये विशेष चर्चेत आली, ती म्हणजे राधा पाटील. इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध आहे. गौतमी आणि राधा या दोघींमधील वाद काही नवीन नाही. राधाने अनेकदा गौतमीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टीका केली आहे.
राधाने केलेल्या या टीकेवर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं राधाबद्दल तिचं मत मांडलं. अभिजात मराठी ओटीटीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला राधाबद्दल प्रश्न विचारला.
यावर गौतमीने हसत उत्तर दिलं की, “माझ्यावर तिचं खूप प्रेम आहे. खूपच जास्त. मी नेहमीच म्हणते की, माझ्याबद्दल कुणी काही बोललं तर मला त्याचा काहीच फरक पडत नाही. मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. हाच माझ्या आयुष्याचा मंत्र आहे. कुणी काहीही बोलल्याने मला फरक पडत नाही. कितीही काहीही बोलूदे. माझं नाव घ्यायचं आणि काहीही बोलायचं? पण ठीक आहे. मी त्याकडे लक्ष देत नाही. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नॉर्मल आहेत. मी तर उलट म्हणते की तू अजून बोल. अजून टीका कर. मला काहीच फरक पडत नाही.”
“माझ्याबद्दल कुणी काहीही बोलल्याने फरक पडत नाही”
यानंतर तिनं म्हटलं, “लोकांना वाटतं की, टीका आणि ट्रोलिंगमुळे मला फरक पडेल. पण तसं नाही. जवळच्या लोकांकडून मला अशा परिस्थितीत खूप पाठिंबा मिळतो. कुणी माझ्यावर टीका वगैरे केली तर माझे सहकारी मला ते दाखवतात. पण मला त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटत नाही. मला कुणाबद्दल बोलायला आवडत नाही. त्यांनासुद्धा माझ्याबद्दल कुणी काहीतरी बोलल्याने फरक पडत नाही. मला एक कळतं आपल्याला ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्यावर जे प्रेम करतात त्यांच्या कडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत, त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.”
ट्रोलर्सना उत्तर द्यायच्या आधीच माझ्या अनेक चाहत्यांनी…
शेवटी गौतमीने म्हटलं, “मला अनेक लोक ट्रोल करतात किंवा सोशल मीडियावर टीका वगैरे करतात. मला ट्रोल केलेल्या लोकांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी उत्तरं दिलेली असतात. मी उत्तर द्यायच्या आधीच माझ्या अनेक चाहत्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे मला याचा अभिमान वाटतो की मला बोलायची गरजच पडली नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनीच त्यांनी आधीच उत्तर दिलं आहे. हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे, हेच प्रेम टिकवण्यासाठी मी प्रयत्न करते.”
गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यातील वादाबद्दल…
गौतमीबरोबरच्या वादाबद्दल राधा म्हणाली होती, “सांगलीतल्या एका कार्यक्रमात गौतमी उशिरा आली होती. तेव्हा ती माझ्याबद्दल ‘राधा कोण आहे? तिची लेव्हल काय?’ असं म्हणाली होती. गौतमी निघून गेली, नंतर तिथल्या माणसांनीही मला सांगितलं गौतमी पाटील येऊन आम्हाला म्हणाली राधाची लेव्हल आहे का? की मी तिच्याबरोबर कशी नाचणार? मला ते सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात वाद सुरु झाला.” तर राधाने ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात एन्ट्री घेताच गौतमीवर टीका केली होती. गौतमीचं नाव घेत राधा ‘स्टेजवर समोर कोणीही आलं तरी मी घाबरत नाही. मग ती गौतमी पाटील असो वा कोणीही… मी नाही घाबरत’ असं म्हणाली होती.

