|| उमेश करंदीकर

वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि धाडस या गुणांमुळे मराठी चित्रपट आज भाषक सीमांच्या बंधनांपलीकडे पोहोचला आहे. नागराज मंजुळे, मंगेश हाडवळे, भाऊराव कऱ्हाडे असे अनेक दिग्दर्शक शहरी प्रेक्षकांना अपरिचित  असलेल्या प्रदेशातून आले आणि त्यांच्या नजरेतून उजळलेल्या वेगळ्याच जगानं प्रेक्षकांना विचारसमृद्ध केलं. दुर्लक्षित राहिलेली अनेकानेक हिरेमाणकं संधी मिळताच कशी स्वयंतेजानं तळपतात, याचा आणखी एक प्रत्यय म्हणजे ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेबमालिका!

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

पैसा आणि जगण्याची निश्चिंती मिळवण्याचं ठिकाण म्हणजे ‘मुंबई’! या भावनेतून गावाकडच्या अनेक वाटा मुंबईच्या दिशेनं वाहातात. त्यातल्याच एका वाटेनं काही वर्षांपूर्वी नितीन पवार हा तरुण महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी म्हणून या नगरीत आला. शिक्षण पूर्ण झालं पण तोवर कलाक्षेत्राची मनातली ओढही जागी झाली होती. महर्षि दयानंद महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच एकांकिकांमधला सहभाग वाढला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर छोटय़ा पडद्याचं क्षेत्र खुणावत होतं. अनेक मालिकांसाठी सहदिग्दर्शक म्हणून काम सुरू होतं. पण तरीही मुंबईत मन पूर्ण रमत नव्हतं. गावाची याद काही मिटत नव्हती. उलट रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं जगणं तर हरवलेलं नाही ना, हा प्रश्न मन अधिकच उसवू लागला. त्यातून सुरू झाला एक प्रवाहाविरुद्धचा प्रवास. मुंबई सोडून पुन्हा गावचा रस्ता त्यानं धरला, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या गाठीशी होते अनेक अनुभव, अनेक विचार. गाव आणि शहर, असा सरधोपट संघर्ष डोक्यात नव्हता. तर मुंबईकडे धावत जाणाऱ्या वाटांवरची जीवन घडवू पाहणाऱ्या तरुणांची भांबावलेली गर्दी त्याला अस्वस्थ करीत होती. ‘गावात जाऊन काय करणार?’ ‘काय ठेवलंय गावात?’ अशा प्रश्नांचे बाण मनाला टोचत होतेच. मनाची पाटी मात्र आता पुन्हा कोरी झाली होती, पण विचारांची घुसळण थांबली नव्हती. त्या घुसळणीतूनच अनेक समविचारी कलाप्रेमी माणसं जोडली गेली. पण सगळेच गावकरी. गाव सोडून मुंबईला कलाक्षेत्रात यावं, अशी कुणाचीही इच्छा नव्हती. त्यात सगळेच होते.. अगदी लहान मुलापासून ते जख्ख म्हाताऱ्यापर्यंत! आपणही गावातच राहायचं आणि गावातल्या या ‘कलाकारां’ना घेऊन काहीतरी करायचं, या घुसळणीतूनच झळकू लागली ‘कोरी पाटी’! ‘कोरी पाटी प्रॉडक्शन्स’ या नावाखाली मग वेबमालिका तयार करण्याचा विचार झाला आणि पाहता पाहता वेवमालिकांचे अनेक भाग तयार होत गेले. ‘गावाकडल्या गोष्टी’ ही त्यापैकी लोकप्रियतेचे उच्चांक स्थापित करणारी वेबमालिका.

आता या मालिकेत अनेकांना तांत्रिक चुकाही दिसतील, कधी कधी संवाद नीट ऐकू येत नाहीतसं वाटेल, कधी लहान मुलांच्या तोंडी सहज येणाऱ्या शिव्या आणि शाळेतल्या मुलांपासून ते तरुण पिढीपर्यंतच्या प्रेमाचं कधी अघळपघळ वाटणारं दर्शन काहींना खटकेलही, पण या सर्व गोष्टी फिक्या पडाव्यात अशा जमेच्या अनेक बाजूही आहेत. सर्व उणिवांवर मात केली आहे ती मालिकेचं मध्यवर्ती विचारबीज, मनाला भिडणारे संवाद, डोळ्यांना सुखावणारं गाव आणि कलाकारांचा सहज अभिनय.. आता यांना खरं तर ‘कलाकार’ आणि ‘अभिनय’ या साच्यापुरतं पहावं का? नाही! ते कोणी कलावंत वाटतच नाहीत. तर गावाच्या मातीतलेच वाटतात, त्यांचा सहज वावर हा अकृत्रिम अभिनयाचा वस्तुपाठच आहे. मुख्य म्हणजे आपणही जणू त्यांच्याबरोबर त्याच गावात आहोत आणि आपल्या डोळ्यांसमोरच सारं काही घडत आहे, असंच वाटतं इतके आपण एकरूप होऊन जातो.

या मालिकेनं जाता जाता खूप गंभीर विषयांना सहज स्पर्श केला आहे आणि प्रत्येकाला अंतर्मुखही केलं आहे. मग ते ‘मुंबैचाच मुलगा नवरा म्हणून पाहिजे’चा हट्ट असो की गावात काही भवितव्य नाही, आता मुंबईच गाठली पाहिजे, ही तरुणांच्या मनातली मानसिकता असो. शेतीपासून दुरावणारी नवी पिढी असो की जमीन ही आई न उरता पैसे मिळवून देणारी संधी वाटू लागणं असो.. गावातल्या तरुणाईला भिडणाऱ्या अनेक प्रश्नांना नर्मविनोदी शैलीनं ही वेबमालिका स्पर्श करते आणि अनेकदा नकळत डोळ्यांतून टचकन पाणीही काढते!

आज या ‘कोरी पाटी’ ने तब्बल सहा लाख सबस्क्राइबर्सचं पाठबळ मिळवलं आहे आणि ते दर भागांमागे हजारोंच्या पटीत वाढतच आहे. वलयांकितांचा वावर असलेल्या अनेक मराठी वेबचॅनललाही त्यांनी या घडीला तरी मागं टाकलं आहे. कोणत्याही ओळखीची पुटं चेहऱ्यावर नसलेल्या गावाकडच्या ओबडधोबड चेहऱ्याच्या, पण सच्च्या मनाच्या माणसांची ही किमया त्यामुळेच थक्क करणारी आहे.

पण हे कसं साधलं असावं? का साधलं असावं? याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या मनात एक ‘गाव’ आहेच! शहरातल्या काटेबंद घडय़ाळबद्ध आयुष्यात त्या गावाची साद अगदी क्षीणपणे का होईना, पण ऐकू येते. ते गाव या मालिकेत पुन्हा पुन्हा भेटतं आणि अगदी डोळे भरून पाहता येतं. यातले संवाद कधी हळवे करतात, कधी मुक्तपणे हसवतात, कधी आपल्याच गतजीवनाचा अल्बम वाटतात.. आणि हे सारं हवंहवंसं वाटतं. आपल्या हातातल्या मोबाइलच्या चौकटीतून या गावात हवं तेव्हा हवं तेवढा वेळ स्वत:ला हरवून टाकता येतं.. ही संधी ही मालिका देते आणि म्हणूनच ती आपलीशी वाटते. तिच्या यशाचं रहस्य या आपलेपणातच आहे.

मालिका सुरू झाली तेव्हापासून संत्या आणि त्याच्यावर प्रेम असलेली, पण दुसऱ्याशी लग्न होऊन सासरी गेलेली सुरकी या दोन पात्रांशी प्रेक्षकांचे भावबंध जुळले. पण त्यांचं लग्न का होऊ शकलं नाही, याचं उत्तर मालिकेचे दोन सीझन होऊनही नीटसं मिळालं नव्हतं. तेच उत्तर देणारा चित्रपटच ‘कोरी पाटी’नं बनवला आहे.. संतुर्कि! तोदेखील १ जुलैला थेट प्रदर्शित आणि प्रसारित होणार आहे तो ‘यू टय़ूब’वरच. मुंबईत रविवार ३० जूनला त्याचा विशेष खेळ होणार आहे. पण वेबचॅनेलच्या जगात हा चित्रपटही नवा विक्रम प्रस्थापित करील.. त्यासाठी गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा!

हरवलेलं गाव पुन्हा हाताच्या ओंजळीत गवसलंय.. निदान भेटा राव एकदा तरी!