‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…’ या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनामुळे नावारुपाला आलेले सिनेदिग्दर्शक संतोष मांजरेकर प्रथमच मराठी नाटक सादर करत आहेत. ‘मर्सिया’ नाटाकाच्या निमित्ताने त्यांचे रंगभूमीवर पदार्पण होत आहे. मानसी राजेंद्र निर्मित, मयूर सरकाळे लिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित हे नाटक जेन झींच्या बदलत्या भावविश्वाचा, नातेसंबंधांचा आणि मानसिकतेचा वेध घेते.
तंत्रज्ञानाच्या वेगवान जगात जगणाऱ्या आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचे संदर्भही बदलले आहेत. प्रेम, एकटेपणा, संवादाचा अभाव, भावनिक अस्थिरता आणि मानसिक स्वास्थ्य यांसारखे प्रश्न नव्या पिढीसमोर वेगळ्या स्वरूपात उभे राहिले आहेत. या बदलत्या भावविश्वातील ताण, राग, चिंता आणि नात्यांमधील गुंतागुंत यांचा वेध ‘मर्सिया’मधून घेण्यात आला आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तणावपूर्ण कार्यपद्धती, बदलती जीवनशैली आणि सामाजिक नैतिक प्रश्नांचा नातेसंबंधांवर होणारा परिणामही नाटकातून मांडण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नाट्य लेखनासाठीची फेलोशिप मिळालेल्या ‘मर्सिया’मध्ये गंभीर विषयांकडे केवळ गंभीरपणे न पाहता, विनोद आणि गांभीर्य यांचा समतोल साधण्यात आला आहे. तरुणाईचे प्रश्न, त्यांचे दैनंदिन जगणे आणि नात्यांमधील विसंगती यांचे चित्रण नाटकातून करण्यात आले आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेता विकास पाटील, श्रेयस वैद्य, समता जाधव आणि नवोदित अभिनेत्री राधा बोरकर प्रमुख भूमिकेत आहेत.
‘मर्सिया’ सादर करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना संतोष मांजरेकर म्हणाले, “प्रत्येक पिढीत नाती बदलतच असतात. जेन झीच्या नात्यांमध्येही हा बदल अर्थातच दिसतो; मात्र या बदलत्या नातेसंबंधात त्यांच्यातला एकटेपणा बदललेला नाही. ‘मर्सिया’ नेमका या विसंगतीवर बोट ठेवतो. आजच्या पिढीच्या मानसिकतेकडे उपदेशाच्या भूमिकेतून नव्हे, तर तिच्याच नजरेतून पाहणारी ही संहिता मला भावली. म्हणूनच रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी ‘मर्सिया’ची निवड केली.” तर या नाटकाची कथा आजच्या तरुणांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भावविश्वाशी थेट जोडलेली आहे. नात्यांमधील ताण, अपेक्षा, संवादाचा अभाव, मानसिक अस्वस्थता आणि बदलती जीवनशैली यामुळे निर्माण होणारे प्रश्न नाटकातून मांडले आहेत. हे प्रश्न केवळ गंभीर पद्धतीने मांडण्याऐवजी विनोद आणि गांभीर्य यांचा समतोल साधत प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणांना या नाटकात स्वतःच्या भावविश्वाचे प्रतिबिंब दिसेल, असे मत दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी व्यक्त केले.
