बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. दोघांची केमिस्ट्री आणि त्यांच्या नात्याचं अनेकदा उदाहरण दिलं जातं. जवळपास दशकभर एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांचा संसार आनंदात सुरू असल्याचं दिसत असलं, तरी लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच जिनिलीया अचानक रडू लागली होती. तिच्या अश्रूंमागचं कारण ऐकून रितेश देशमुखही आश्चर्यचकीत झाला होता.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख अनेकदा एकमेकांबरोबरचे किस्से, कुटुंबातील गंमतीशीर प्रसंग माध्यमांशी संवाद साधताना सांगत असतात. मराठमोळ्या रितेशच्या घरी लग्न करुन गेल्यानंतर अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या, अनुभवता आल्या असं अनेकदा जिनिलीयाने सांगितलं आहे. पण, नवीन लग्न झाल्यानंतर एक महिना होताच जिनिलीयाला सासरी अश्रू अनावर झाले होते. जिनिलीया नेमकी का भावुक झाली होती जाणून घेऊया…
…म्हणून लग्नाच्या एक महिन्यानंतर जिनिलीया झालेली भावुक
नवभारतच्या वृत्तानुसार लग्नाला महिना पूर्ण झाल्यानंतर एक दिवशी सकाळी जिनिलीया अचानक अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले. सकाळीच पत्नीला अशा अवस्थेत पाहून रितेश देशमुखही घाबरला. त्याने तातडीने तिला काय झालं, ती कोणत्या गोष्टीमुळे नाराज आहे का, अशी विचारपूस केली. त्यावर जिनिलीयाने दिलेलं उत्तर हे अनेक काम करणाऱ्या महिलांनी अनुभवलं असेल. नव्या आयुष्याची सुरुवात आणि अचानक आलेला रिकामेपणा यामुळे जुळवून घेणं तिला कठीण जात असल्याचं तिने सांगितलं.
जिनिलीयाने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. अवघ्या १६-१७ वर्षांची असल्यापासून ती सतत चित्रपटांचं चित्रीकरण, जाहिरातींचे शूट आणि प्रवास यामध्ये व्यग्र असायची. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमध्ये काम करत असताना तिने कोणताही मोठा ब्रेक न घेता सातत्याने काम केलं होतं. त्यामुळे लग्नानंतर अचानक दैनंदिन धावपळ थांबल्याने आणि आयुष्यात मोकळा वेळ वाढल्याने त्या बदलाशी जुळवून घेणं तिच्यासाठी सुरुवातीला कठीण ठरलं. लग्नानंतर जिनिलीयाने कामातून काही काळासाठी छोटासा ब्रेक घेतला. मात्र, अनेक वर्षांच्या सततच्या धावपळीनंतर अचानक घरी राहणं आणि कोणत्याही कामाशिवाय दिवसाची सुरुवात करणं तिला कठीण वाटू लागलं. वर्षानुवर्षे व्यग्र दिनचर्येनंतर मिळालेल्या या मोकळ्या वेळेमुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती.
रितेशने दिलेला सल्ला
जिनिलीयाचं म्हणणं ऐकल्यानंतर रितेश देशमुखने अतिशय समजूतदारपणे आणि प्रेमाने परिस्थिती हाताळली. त्याने तिला समजावून सांगितलं की, लग्न म्हणजे स्वतःचं अस्तित्व किंवा आवडीचं काम सोडणं नसतं. रितेशने जिनिलीयाला सांगितलं की, जर तिला अभिनयाची आवड असेल, तर केवळ घरापुरतं स्वतःला मर्यादित ठेवण्याची गरज नाही. स्वतःच्या इच्छेनुसार चित्रपटांची निवड कर आणि स्वतःची वेगळी ओळख कायम ठेव, असा सल्ला त्याने तिला दिला. रितेशच्या या शब्दांमुळे जिनिलीयाच्या मनावरील ताण हलका झाला आणि तिला नव्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचं बळ मिळालं.
२००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेलं रितेश आणि जेनेलियाचं नातं आजही तितकंच घट्ट आहे. दोघांनीही एकमेकांच्या भावना, गरजा आणि स्वातंत्र्याचा नेहमीच आदर केला आहे. आज रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे दोन मुलांचे आई-वडील आहेत. त्याचबरोबर ते व्यावसायिक आयुष्यातही एकत्र काम करत आहेत. लग्नाच्या सुरुवातीच्या काळातील तो भावनिक प्रसंग त्यांच्या नात्याला अधिक परिपक्व आणि मजबूत बनवणारा ठरल्याचं मानलं जातं.
