Genelia Deshmukh Wish Son Riaan : बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. रितेश आणि जिनिलीया यांना महाराष्ट्राचे लाडके दादा-वाहिनी म्हणूनही ओळखलं जातं. दोघं सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. अशातच जिनिलीयानं लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

१० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश-जिनिलीया यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. अशातच आज जिनिलीयाचा मोठा मुलगा रियानचा वाढदिवस आहे. रियानच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने त्याच्याबरोबरच खास फोटो पोस्ट करीत लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर रियानचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोसह जिनिलियानं लिहिलंय, “प्रिय रियान, असं वाटतंय, जणू कालच आपण तुझा पहिला वाढदिवस साजरा केला आणि आज तू अकरा वर्षांचा होत आहेस. तू मोठा होत आहेस, स्वतःचे निर्णय घेऊ शकतोयस, तू स्वत:च तुझा मार्ग ठरवू शकतोयस… आणि मला जाणवतंय की, तुला माझी लागणारी गरजही आता थोडी कमी होत आहे.”

Award Banner

यानंतर जिनिलीया म्हणते, “मला सर्वात जास्त काय आवडतं माहितीय का, रियान? हे सगळे बदल होऊनही, तू मागे वळून पाहतोस… क्षणभर थांबतोस… फक्त इतकं पाहण्यासाठी की मी अजूनही तुझ्या छोट्याशा जगाचा एक भाग आहे की नाही आणि माझ्यासाठी त्यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही.”

रियानच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची खास पोस्ट

यापुढे जिनिलीयानं लिहिलंय, “मला खूप आनंद होतोय की, माझा असा एक मुलगा आहे ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते आणि तो मला ‘आई’ म्हणतो. मी तुझी सगळ्यात मोठी चाहती असेन आणि कदाचित तुझी सगळ्यात मोठी टीकाकारही… पण मी नेहमी तुझी आई राहीन. जिला फक्त एवढंच हवंय की तिच्या या मुलानं आपल्या आयुष्यात सर्वोत्तम बनावं. बाकी मला काही महत्त्वाचं नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या गोड बाळा.”