लोकसत्ता प्रतिनिधी
हिंदीत विनोदी भयपटांचे ‘युनिव्हर्स’ तयार करण्याचे श्रेय मॅडॉक फिल्म्स या निर्मिती संस्थेकडे जाते. त्याच धर्तीवर मराठीतही सामायिक कथा-संकल्पनेवर आधारित चित्रपटांचे युनिव्हर्स सुरू करण्याचा निर्धार दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी केला आहे. त्याचा पहिला अध्याय म्हणजे ‘घबाडकुंड’ हा चित्रपट. भव्यदिव्य आणि प्रत्यक्ष सेट घडवून तिथे चित्रीकरण केलेला असा भयपट मराठीत प्रेक्षकांनी आजवर अनुभवलेला नाही, असा दावा या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील कलाकार देवदत्त नागे, संदीप पाठक, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर आणि निर्माते डॉ. रसिक कदम यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत केला.
मराठीतील पहिल्या चित्रपट युनिव्हर्सचा भाग ‘घबाडकुंड’ हा दिग्दर्शक प्रीतम यांनी ठरवलेल्या चित्रपट युनिव्हर्समधला पहिला अध्याय आहे, असे बरेच अध्याय येऊ घातले आहेत. सध्या मराठी प्रेक्षकांची जी बदललेली अभिरुची आहे ती लक्षात घेता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असा हा चित्रपट आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम यांनी दिली. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उत्तम आहे. व्हीएफएक्स, रंगांकन, संगीत सगळ्याच बाबतीत हा चित्रपट वेगळा आहे. कुठल्याही वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, अशा या चित्रपटाला निर्माता म्हणून पाठिंबा देताना जबाबदारीची भावना अधिक होती, असं त्यांनी सांगितलं.
चांगलं द्या, प्रेक्षक पाठीशी आहेत…
‘मराठीतला पहिला ‘युनिव्हर्स’ चित्रपट असा जेव्हा भविष्यात कधी उल्लेख येईल तेव्हा ‘घबाडकुंड’ चित्रपटाचं नाव येईल आणि कलाकार म्हणून आमची नावंही या चित्रपटाशी जोडलेली असतील. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणं आणि त्यातही ‘दिल्या’ ही जी व्यक्तिरेखा मी साकारली आहे, त्याभोवती चित्रपटाची कथा फिरत असल्याने कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे’ अशी भावना अभिनेते संदीप पाठक यांनी व्यक्त केली. ‘मराठी प्रेक्षकांना चांगली कलाकृती पाहायला मिळाली तर ते नेहमीच पाठिंबा देतात. माझ्या समाजमाध्यमांवर आलेली प्रेक्षकाची एक प्रतिक्रिया माझ्या लक्षात राहिली आहे. ‘तुम्ही चांगलं द्या, आम्ही पाठीशी आहोत’. नव्या पिढीची जी नावीन्याची आस आहे ती पूर्ण करणारा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट आहे. एखाद्या हॉटेलमध्ये खूप छान चवीचे पदार्थ मिळतात, अशी माहिती मिळाल्यावर कितीही गर्दी असली, महागडं असलं तरी लोक रांगेत उभं राहून तिथे त्या पदार्थांचा आस्वाद घेतात. सिनेमाच्या बाबतीतही असंच आहे, चित्रपट चांगला असेल तर लोक आवर्जून पैसे खर्च करून चित्रपट पाहतात. ‘छावा’ सारख्या चित्रपटाने केलेल्या कमाईपैकी ३०० ते ३५० कोटी रुपये हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांमुळे मिळाले. त्यामुळे ‘घबाडकुंड’ सारखी वेगळी मांडणी, आशय असलेल्या चित्रपटाला प्रेक्षक गर्दी करतील, असा विश्वासही संदीप पाठक यांनी व्यक्त केला.
योग जुळून आला…
‘मी प्रीतम एस. के. पाटील यांनी दिग्दर्शित केलेला ‘अल्याड पल्याड’ चित्रपट पाहिला होता, तेव्हाच विनोदी भयपट शैलीतला अशा पद्धतीचा चित्रपट आपण करायला हवा, असा विचार मनात पक्का झाला होता. आणि मध्यंतरी एका चित्रपटातलं माझं काम पाहून प्रीतम यांनी ‘घबाडकुंड’ चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केली. त्यामुळे मी विचार केला आणि लिखाणात उत्तम असलेला, वेगळी तांत्रिक मांडणी आणि भयपट शैलीतला शिवाय, मराठीत पहिल्यांदाच ‘युनिव्हर्स’ची संकल्पना विकसित करणाऱ्या या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हा योग जुळून आला’, असा अनुभव अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने सांगितला.
‘गेल्या वर्ष-दीड वर्षांत ‘आता थांबायचं नाय’, ‘घबाडकुंड’सारख्या वेगळ्या चित्रपटात काम करायला मिळालं, या चांगल्या सशक्त भूमिका होत्या, पण अशा पद्धतीच्याच भूमिका कराव्यात इतका चोखंदळपणा बाळगण्याइतपत परिस्थिती माझ्याबाबत नव्हती. आत्ता मात्र या सगळ्या चित्रपटांमुळे भविष्यात निवडक भूमिका करण्याचा आग्रह जपणं शक्य होईल’, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
स्टंट्स करायची इच्छाही पूर्ण
‘आत्तापर्यंत मी मालिकेतून सुशील, साध्या-सद्गुणी अशा मुलीच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातली माझी व्यक्तिरेखा अगदी याच्या उलट प्रकारची आहे. त्यातही ती एका वेगळ्या काळातली आहे. त्यामुळे त्या काळात स्त्रियांचा वावर कसा होता, नऊवारी साडी, तेव्हाचे दागिने, त्यात मला आठ ते नऊ महिन्यांची गर्भवती साकारायची होती. त्यात तिला जेव्हा प्रसूती कळा सुरू होतात, तेव्हा तिला काय त्रास होतो, काय वाटत असतं या सगळ्याविषयी मला कल्पना नव्हती. तर त्याविषयी मी बऱ्यापैकी माझ्या घरातल्या स्त्रियांची मदत घेतली, डॉक्टरांकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्यामुळे या भूमिकेच्या पूर्वतयारीत अभ्यास करणं जितकं गरजेचं होतं, तितकंच स्टंट्सचीही तयारी करावी लागली. मी स्वतः कराटे शिकलेले असल्याने साहसी काही गोष्टी करायला मला मनापासून आवडतं आणि म्हणून या चित्रपटात मला भूमिकेसाठीचा अभ्यास, स्टंट्स सगळ्या प्रकारे काम करता आलं’, असं अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने सांगितलं.
समाजमाध्यमांचं दुधारी शस्त्र
या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत असलेल्या अभिनेता कुशल बद्रिके याने समाजमाध्यमांविषयी आपलं मत व्यक्त केलं. ‘समाजमाध्यमांनी जग खूप जवळ आणलं आहे. लंडनमध्ये प्रयोग आहे किंवा चित्रीकरण होणार आहे, तर त्याआधी तिथे काय वातावरण आहे, तिथे जाण्याासाठी काय तयारी करायला हवी, काय काळजी घ्यायला हवी, तिथे आपण राहणार असू तर काय काय पाहायलाच हवं हे सगळं सहजपणे जाणून घेण्यासाठी समाजमाध्यमांचा खूप फायदा होतो.
समाजमाध्यमं हे एक शस्त्र आहे, ते उत्तमपणे हाताळला आलं तर ते खूप फायदेशीर होतं. म्हणजे माझे चित्रपट किंवा अन्य काही काम मी करत असेन तर त्याविषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यम हे सगळ्यात सोपं, सहज हाताशी असणारं असं माध्यम मला वाटतं. माझ्या चाहत्यांपर्यंत माहिती पोहोचवणं सोपं झालं आहे. पण, ते नीट हाताळता आलं नाही तर तुम्ही त्यात वाहवत जाऊ शकता, तुमचं नुकसानही होतं, तर ते दुधारी शस्त्रासारखं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे’, असं त्याने सांगितलं.
फिटनेसचा उपयोग झाला…
फिटनेसबाबत आग्रही असलेल्या अभिनेता देवदत्त नागे याने त्याचा फायदा अधिक होतो, असं सांगितलं. ‘जय मल्हार’ करताना काही प्रमाणात मला फिटनेसमुळे काही प्रमाणात मर्यादा येतात की काय, असं वाटलं होतं. म्हणजे खंडेरायांची भारदस्त प्रतिमा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मालिकेच्या काही भागांमध्ये मला वृद्धत्व येतं अशा आशयाची कथा होती. त्यावेळी वजन कमी करून मग शरीर उतरल्यासारखं दाखवता येईल, असं पहिल्यांदा मनात आलं. पण, खंडेरायांची एरव्हीची प्रेक्षकांच्या मनातली प्रतिमा लक्षात घेतली तर ते तितकं चांगलं वाटलं नसतं. म्हणून मग कायिक अभिनयातूनच ते दाखवायला हवं हे पक्कं झालं. मग त्यापद्धतीने एका वृद्धाची देहबोली कशी असेल, बोलण्याची पद्धत कशी असेल, थोडे ढगळ कपडे घालून बारीक दिसता येईल, अशा सगळ्याचा वापर करून त्या भागांचं चित्रीकरण केलं आणि तेही प्रेक्षकांना आवडलं. तेव्हा खऱ्या अर्थाने लक्षात आलं की शारीरिक फिटनेसवर थोडी अधिक मेहनत घेतली तर त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो. त्यामुळे कधी कुठला योद्धा किंवा थोडं रांगडंं व्यक्तिमत्त्व साकारायचं असेल तर मला आवर्जून विचारणा होते. एका हिंदीतील कास्टिंग दिग्दर्शकाने सांगितलं होतं की आम्ही ऑडिशनसाठी सूचना देतानाही देवदत्त नागेसारखी, फिट शरीरयष्टी हवी, हे नमूद करतो, असं सांगितलंं होतं. त्यामुळे फिटनेसचा खूप चांगला अनुभवच मला आला आहे, ’असं देवदत्त नागे याने सांगितलं. अर्थात, पीळदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी स्टेरॉइड्स किंवा अन्य कृत्रिम गोष्टींचा आधार कधीच घेतलेला नाही, हेही त्याने स्पष्ट केलं. ‘घबाडकुंड’ चित्रपटातली खंग्रीची भूमिकासुद्धा अशाच रांगड्या व्यक्तीची आहे, अशी माहितीही त्याने दिली.
