Premium

घर बंदूक बिर्याणी : पुन्हा एकदा नवा प्रयोग !

नोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे मंजुळे आता ‘घर बंदूक बिर्याणी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ghar banduk biryani director nagraj manjule with star cast in loksatta office for movie promotion
येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजूळे, आकाश ठोसर, सायली पाटील आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी खास गप्पा मारल्या.

‘सैराट’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे मंजुळे आता ‘घर बंदूक बिर्याणी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चा ही दिग्दर्शन किंवा निर्मितीमुळे नसून त्यांच्या अभिनयामुळे आहे. येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजूळे, आकाश ठोसर, सायली पाटील आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी खास गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे ठरले चित्रपटाचे नाव

या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी ‘बिर्याणी’ नावाची पटकथा लिहिली होती. करोना काळाआधी त्यांनी सांगितलेली ही कथाकल्पना मला आवडली. माझी काम करण्याची एक वेगळीच तऱ्हा आहे. मला ही कथा पुन्हा एकदा नीट लिहावीशी वाटली. त्यानंतर हेमंत आणि मी सहा महिने या चित्रपटाची कथा लिहित होतो. लिहिता लिहिता त्यातली गोष्ट उलगडत गेली आणि ‘घर बंदूक बिर्याणी’ असे चित्रपटाचे नाव आम्हाला मिळाले, हा किस्सा सांगतानाच चित्रपटाचे नाव अनेकदा पटकथा-संवादलेखनाच्या प्रक्रियेत कसे गवसते हेही नागराजने सांगितले.  ‘झुंड’ चित्रपटाचीही कथा लिहून झाली आणि ‘झुंड नही टीम कहीयें’ हा संवाद लिहिल्यानंतर ‘झुंड’ हेच चित्रपटाचे नाव असल्याचे लक्षात आले होते, असे त्यांनी सांगितले.

नवी जोडी

या चित्रपटाच्या निमित्ताने आकाश ठोसर आणि सायली पाटील ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नागराज मंजुळेंच्याच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातून पहिल्यांदाच सायली पाटीलने काम केले होते. ‘झुंड’ चित्रपटातील भावना ही व्यक्तिरेखा माझ्यासारखीच होती. या चित्रपटात मात्र मी लक्ष्मी या गावातील एका साध्या, लाजऱ्याबुजऱ्या तरुणीची भूमिका केली आहे. लक्ष्मीचे हावभाव, तिचा वावर हे स्वत: नागराज मंजुळे यांनी साभिनय समजावून सांगितले, अशी आठवणही सायलीने सांगितली.

शेवटी सगळा पैशांचा कारभार

गेली काही वर्ष मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही किंवा मराठी प्रेक्षक चित्रपगृहात येत नाहीत, याबद्दल चर्चा होते. ‘चित्रपट चांगले नाहीत म्हणून प्रेक्षक पाहायला येत नाहीत की प्रेक्षक येत नाहीत म्हणून चांगले चित्रपट येत नाहीत, याचा अभ्यास खरंतर आपणच करायला हवा. मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येतात आणि भरभरून दाद देतात हे याआधी अनेकदा सिद्ध झालेले आहे’, असे नागराज यांनी सांगितले. तर चित्रपटगृह वा चांगले शो न मिळणे हा पूर्णत: व्यावसायिक भाग आहे. चित्रपट पाहायला प्रेक्षक येत असतील तर नक्कीच चांगले शो मिळतात, मात्र कधीतरी चित्रपट चांगला असूनही प्राईम टाईम मिळत नाही. शेवटी हा सगळा पैशांचा कारभार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागणी तसा पुरवठा

कोणताही चित्रपट चित्रपटगृहात किती चालतो? याचे जगभरातील प्रमाण हे थोडय़ाफार प्रमाणात सारखेच असल्याचे  मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले. ज्या दाक्षिणात्य चित्रपटांचा सध्या गवगवा सुरू आहे, तिथेही चित्रपट चालण्याचे प्रमाण मराठी इतकेच आहे. हॉलीवूडच्या चित्रपटांचीही तीच स्थिती आहे. तेथील चित्रपट आपल्याकडे कोणत्याही प्रसिद्धीशिवाय चालतात. मात्र मराठीच्या बाबतीत प्रेक्षकांना एखादा चित्रपट आवडला तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर काम चालत असल्याने बऱ्याच वेळा चित्रपटासाठी मागणी तयार करण्याच्या कामात आपण कमी पडतो, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रसिद्धीवर अधिक भर

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन केलेल्या ‘झुंड’ चित्रपटालाही हवे तसे यश मिळाले नाही. इतका मोठा चित्रपट असूनही लोकांपर्यंत पोहोचला नाही, हे लक्षात आल्यानंतर ‘घर बंदूक बिर्याणी’साठी थोडा अधिक वेळ काढत महाराष्ट्रभरात जितक्या ठिकाणी जाता येईल तितक्या ठिकाणी जाऊन चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचे ठरवले असे नागराज यांनी स्पष्ट केले. ‘झुंड’ चित्रपट अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकला नाही याची खंत न बाळगता काही गोष्टी या वेळेत करायला हव्यात यावर भर दिल्याचेही त्यांनी सांगितले.

जबाबदारीमुळे आकाश घडत गेला

‘सैराट’मुळे परशा प्रचंड लोकप्रिय ठरला, मात्र तेव्हा अभिनय क्षेत्रात काहीतरी करावे असे कधीच ठरले नव्हते. पोलिसात भरती होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे शाळा संपल्यावर तालमीत जाणं सुरू झालं, तिथेच एक दिवस नागराज मंजुळेंच्या भावाने मला पाहिले. त्यामुळे प्रेक्षकांना परशा भेटला आणि मला या क्षेत्राची वाट सापडली, असे आकाश सांगतो.  आणि त्यानंतर प्रेक्षकांना परशा भेटला. आणि त्यानंतर या क्षेत्रातला माझा प्रवास सुरू झाल्याचे आकाशने सांगितले. पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांनी इतके प्रेम दिले की त्यानंतर कलाकार म्हणून शिकण्याची, घडत जाण्याची माझी जबाबदारी वाढली, असे त्याने सांगितले.

प्रेक्षकांवरच अवलंबून दाक्षिणात्य चित्रपट मुळात दक्षिणेकडे चालतात, त्यानंतर त्या चित्रपटाबद्दलची उत्कंठा इतर राज्यांत वाढली की मग  इतर भाषांमध्ये चित्रपट डब करून तो विविध भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला आधी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्यावर सारेकाही अवलंबून आहे असे मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले. ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपटही ३ भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी आहे, मात्र आता प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत जाऊन या चित्रपटाला प्रतिसाद दिला तरच पुढे इतर भाषेतील डिबग शक्य होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:12 IST
Next Story
 ‘मराठी चित्रपट स्वतंत्रपणे बहरतोय’