Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died: आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पंकज उधास ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है..’ सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.

पंकज उधास यांच्या कन्या नायाब उधास यांनी दिलं वृत्त

पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पंकज यांच्या कन्या नायाब उधास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत आणि हे तुम्हाला सांगत आहोत की पद्मश्री पंकज उधास यांचं निधन झालं. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे संस्कार लाभले. संगिताच्या दुनियेत ते आले आणि इथलेच झाले. पंकज उधास यांच्या निधनानंतर गायक शंकर महादेवन यांच्यासह इतर सेलिब्रिटीजनही दुःख व्यक्त केलं आहे.

कॅसेटच्या काळातला हिट गायक

कॅसेटचा काळ असतानाचा सुपरहिट गायक अशी पंकज उधास यांची ओळख होती. ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’ ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’ अशी किती तरी गाणी आहेत जी आजही प्रेक्षकांना आठवतात ती त्यांच्या शब्दांमुळे आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजामुळे.

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ या दिवशी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मृदू आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.