Girija Oak reveals the downside of being ‘National Crush’ : गिरिजा ओकचे फोटो काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाले होते. ज्यामुळेच तिला ‘नॅशनल क्रश’ हा टॅगसुद्धा मिळाला. ज्यानंतर ती देशभरात नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. अशातच आता अभिनेत्रीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना तिच्या या टॅगमुळे तिला खूप फायदा झाला असेल, खूप कामं मिळाली असतील वाटत होतं. पण, खरंतर याउलट झालं आहे. गिरिजाने नॅशनल क्रश या टॅगमुळे कामं गेल्याचं म्हटलं आहे.

गिरिजा ओक सोशल मीडियावर तशी सक्रिय असायची. त्यामुळे तिचे फॉलोअर्स आधीसुद्धा होते. परंतु, नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झाल्यानंतर तिचे फॉलोअर्स वाढल्याचंही तिने सांगितलं आहे. नुकतीच गिरिजाने अमोल परचुरे यांना मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने नॅशनल क्रश झाल्यानंतरचा अनुभव, त्याचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. गिरिजा नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

नॅशनल क्रशच्या टॅगमुळे माझ्या जाहिरातींची कामं गेली.

गिरिजाने आतापर्यंत जाहिराती, नाटक, चित्रपट, रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमांमध्ये काम केलं आहे. यावेळी मुलाखतीत तिला जाहिरातींबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “जाहिराती आता कमी झाल्या आहेत. शंभरच्या वर जाहिराती केल्या आहेत. पण, आता जरा कमी झाल्या आहेत. जाहिरातींमध्ये जे लोक फार नवीन नसतात पण, फार प्रसिद्धसुद्धा नसतात ना त्यांना खूप जाहिराती मिळतात. अचानक तुम्हाला खूप लोक ओळखू लागले की तुम्ही ती घरातील सामान्य स्त्री वाटत नाही. या नॅशनल क्रशच्या टॅगमुळे माझ्या जाहिरातींची कामं गेली. आता मला जाहिराती फार मिळत नाहीये. म्हणजे असं फार काही विचारणा होत नाहीये”.

नॅशनल क्रशमुळे तुझ्या हाती काय लागलं असं विचारल्यानंतर गिरिजा म्हणाली, “फॉलोअर्स मिळाले मला. ती गोष्ट हाती लागली.” गिरिजा पुढे या अनुभवाबद्दल म्हणाली, “काय हाती लागलं म्हणण्यापेक्षा मजेदार अनुभव होता. याबद्दल एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे याकडे फार लक्ष दिलं तर लोक म्हणतात आली मोठी, आता डोक्यावर बसेल, झाडावर चढली आणि जर त्याला फार महत्त्व नाही दिलं तर असं कसं तुझी मेहनत आहे तू श्रेय घेतलं पाहिजे असंही म्हणतात. पण, यामुळे मी बऱ्यापैकी अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. ज्यांनी माझे चित्रपट पाहिले नव्हते किंवा जे मला ओळखत नव्हते त्यांनी माझे जुने चित्रपट पाहिले. याचा मला आनंदच आहे”.