अभिनेत्री गिरीजा ओक ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री आहे. फेब्रुवारी महिन्यात तिची चर्चा होती. कारण नॅशनल क्रश हे बिरुद तिच्या नावापुढे लागलं. याबाबत आता गिरीजा ओकने मोकळेपणाने पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. तसंच जाहिरातीत काम कसं केलं ते सांगितलं आहे. एवढंच नाही तर वडिलांनी पहिला चित्रपट करण्याआधी आपल्याला दोन कुठले मोलाचे सल्ले दिले होते हे देखील गिरीजाने सांगितलं आहे.
मी जाहिरातीत अपघाताने काम करु लागले-गिरीजा ओक
मी जाहिरातीत काम करु लागले ते अगदीच अपघाताने झालं. मी आणि माझी आई एका नव्या जाहीरात प्रोडक्शनच्या ओपनिंगसाठी गेलो होतो.ज्यांची कंपनी होती, ते माझ्या आईचे ओळखीचे होते.तिथे मला एका कास्टिंग डायरेक्टरने बघितलं.तिथेच माझ्या आईला विचारलं की, तुमची मुलगी एका जाहीरातीसाठी ऑडिशन करेल का? तिथल्या तिथेच माझी एक छोटीशी स्क्रिनटेस्ट घेतली आणि ती जाहिरात मला मिळाली. त्यामुळे मुळात आम्ही ऑडिशनसाठी गेलोच नव्हतो.अचानकच ते घडलं आणि मी काही जाहीराती करत गेले.तुम्ही जाहिराती सगळ्या बघितल्या असतील,तर एक लहान मुलगा असतो आणि त्याची एक शहाणी मोठी बहीण असते.त्या मोठ्या बहिणीच्या वयोगटात मी इतकी फीट होत असे की तशा मला अचानक जाहीराती मिळत गेल्या आणि मी जाहीराती करू लागले. माझ्या पहिल्या जाहिरातीबाबत तर माझे वडील गिरीश ओक यांना ठाऊकही नव्हतं. एनडीटीव्ही मराठीच्या मंच महाराष्ट्राच्या रणरागिणींचा गौरव या विशेष कार्यक्रमात गिरीजा ओकने हे वक्तव्य केलं.

चित्रपट करण्यापूर्वी वडिलांनी मला दोन सल्ले दिले होते-गिरीजा ओक
गिरीजा पुढे म्हणाली, नंतर मला एका चित्रपटासाठी कॉल आला आणि त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. माझी त्यांनी चित्रपटासाठी निवड केली. त्यावेळी शुटिंग सुरु होण्याच्या आदल्या दिवशी बाबांनी मला समोर बसवलं आणि सांगितलं की एक तर काही पटत नसेल तर जोरात आणि ठामपणे नाही म्हणायला शिक. कारण या वयात सगळं भारावून टाकणारं असतं, आपल्या आसपासचे सगळे अनुभवाने आणि वयाने मोठे असतात. पटकन होकार दिला जातो, त्यामुळे नाही म्हणायला शिक. मनं दुखावू नकोस पण नाही म्हणायला शिक असा मोलाचा सल्ला मला वडिलांनी (गिरीश ओक) दिला. तसंच ते म्हणाले मी तुझी काहीच मदत कधीच करणार नाही. त्यामुळे ती अपेक्षा ठेवू नकोस. तुला एखादा संवाद कसा म्हणायचा किंवा त्याचा गर्भित अर्थ काय? हे जर तुला मदत म्हणून हवं असेल तर ते मी करेन. पण तुझं नाव मी माझ्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सुचवणार नाही. हिला जरा कास्ट कर वगैरे मी म्हणणार नाही. कारण एकच आहे की तू ५० किंवा ६० वर्षांची होशील आणि कामाचं अवलोकन करशील तेव्हा तुला हे समाधान असेल की हे सगळं मी मिळवलं. मी आत्ता तुझी काही मदत करण्यापेक्षा मी तुला हे समाधान देऊ इच्छितो. त्यामुळे मी शिफारस करणार नाही.
गिरीश ओक यांची काय आठवण गिरीजाने सांगितली?
शिफारस करणार नाही हे बाबांनी इतकं त्यांनी पाळलं की एकदा असं घडलं होतं की एक निर्माते माझ्याकडे आले होते. मला त्यांनी विचारलं की तुम्हाला काम करायला आवडेल का? आम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांना यातल्या भूमिकांबाबत विचारलंय यातला वडिलांचा रोल आम्ही गिरीश ओक यांना विचारतो आहोत. तुम्हाला ते माहीत असतीलच. तर मी म्हटलं की हो मला माहीत आहेत. मी हसले, त्यावर त्यांनी विचारलं काय झालं तर मी म्हटलं अहो गिरीश ओक माझे वडील आहेत. त्यावर ते म्हणाले आडनाव ऐकून आम्हाला वाटलं होतं की तुमचं काहीतरी नातं असेलच. पण कमाल आहे, गिरीश ओक सरांना भेटलो त्यांना आम्ही सांगितलं की यातल्या अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी आम्हाला अभिनेत्री कोण ते सुचवा. तर त्यांनी चार ते पाच नावं लिहून दिली पण तुमचं नाव दिलं नाही त्यांनी. मी म्हटलं बरोबर आहे ते माझं नाव देणार नाहीत, कारण आमचा तो करार आहे. त्यामुळे त्यांनी ते प्रचंड पाळलं. योगायोगाने मला हे समजलं होतं, मी त्यांची खूप ऋणी आहे. कारण बाबांनी मला जे दोन मोलाचे सल्ले दिले त्यावरच मी वाटचाल करते आहे. असं गिरीजा ओकने म्हटलं आहे.

मी कुणाला काही शिकवू शकेन असं वाटत नाही-गिरीजा ओक
ज्या क्षणी तुम्हाला असं वाटू लागतं की आपण कामाने मोठे आहोत तेव्हा तुमचा प्रवास थोडासा मंदावतो आणि मग तो थांबतो. मला अजून खूप काम करायचं आहे. मला शिष्यासारखं राहणं पटतं. नाटकाचं वर्कशॉप करतोय येशील का? अभिनय कसा करायचा सांगशील का? असं विचारलं तर मी नाही म्हणते. कारण मी कुणाला काही शिकवू शकेन अशा भूमिकेत मी कधी जाऊ शकेन असं मला वाटत नाही. मला शिष्यासारखंच राहाणं आवडेल असंही गिरीजाने म्हटलं आहे.
