Girija Oak Talks About Her Parents Divorce : गिरिजा ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह तिने हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती नॅशनल क्रश म्हणून चर्चेत आहे. गिरिजा अलीकडे सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय़ ठरली. तिचा निळ्या साडीतील फोटो खूप व्हायरल झाला.
गिरिजा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. परंतु, ती लहान असतानाच गिरिजाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला. त्यामुळे तिला अवघ्या लहान वयातच थेरपी घ्यावी लागली होती. त्याबद्दल तिने स्वत: सांगितले आहे. न्यूज १८शी संवाद साधताना अभिनेत्रीने याबद्दल सांगितले आहे.
१७ व्या वर्षी मी थेरपी घेतली – गिरिजा ओक
गिरिजा म्हणाली, “मी खूप लहान असतानाच आई-वडिलांचा घटस्फोट झालेला. त्यामुळे अशा वातावरणात मी वाढलेली आहे. मी मला बरं वाटावं, मी त्या वातावरणातून बाहेर यावी यासाठी थेरपी घेतली. फक्त शारीरिक दृष्ट्याच नाही, तर मला माझ्याबरोबर काहीतरी घडतंय, असं वाटत होतं. आधी मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. पण त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला सांगितलं आणि पहिल्या भेटीत तिनं मला थेरपिस्टला भेटायला सांगितलं. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी मी पहिल्यांदा थेरपी घेतली.”
गिरिजाने पुढे थेरपीच्या वेळी तिच्याबरोबर तिचे आई-वडील असते, तर तिच्याबरोबर त्यांनाही या गोष्टीचा फायदा झाला असता, असे सांगितले. ती म्हणाली, “थेरपी तर घेतलीच; पण त्यावेळी जर आई-बाबा माझ्याबरोबर आले असते, तर माझ्याबरोबर त्यांनाही या गोष्टीचा फायदा झाला असता. जेव्हा एखाद्या कुटुंबात दुरावा येतो तेव्हा वैयक्तिकरीत्या खूप गैरसमज होतात आणि त्यावर उपायही नसतात.”
गिरिजाने पुढे सांगितले, “जेव्हा आई-बाबा वेगळे झाले तेव्हा त्यांनाही या गोष्टीचा त्रास झाला. हा त्यांचा निर्णय होता, जो त्यांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी बरोबर होता. माझ्या आई-वडिलांनी स्तव:ला निवडलं. मला त्यावेळी खूप प्रश्न पडायचे. मला असं वाटायचं की, मला त्यांच्याबरोबर एकत्र राहायला मिळावं, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहावं.”
