ग्लॅमगप्पा : प्रशंसेचा धनी

इतक्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड झालेली दिया सध्या भलतीच खूश आहे.

मसक्कलीला अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताचं आमंत्रण असतं. प्रत्येक ठिकाणी जायला काही मला जमत नाही पण खुद्द राजकुमार हिरानींनी आमंत्रण दिल्यावर मला जाणं भागच पडलं. तिथे गेल्यावर मला आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे चक्क मिर्झाची आणि सध्या सांघांची असलेली दिया मुख्य भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झालेली. इतक्या वर्षांनंतर तिला सेटवर पाहून मी चाटच पडले. म्हटलं बाई गं तू इथे कशी. तर म्हणाली यंदा मी मान्यता दत्त म्हणून पुनर्पदार्पण करतेय. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये हिरानींनी संजयची पत्नी आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्त्री मान्यता हिच्या भूमिकेसाठी दियाची निवड केली आहे. मान्यता ही दुबईवरून आलेली एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. संजय कारागृहात असताना त्याचा व्यावसायिक कारभार तिनेच सांभाळला आहे. इतक्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड झालेली दिया सध्या भलतीच खूश आहे.

प्रशंसेचा धनी

उत्तमोत्तम सिनेमे दिल्याने शाहीदच्या प्रशंसकांमध्ये भलतीच वाढ होतेय. यात आता आणखी एकाची भर पडलीय. मसक्कली नुकतीच विशाल भारद्वाजचा चित्रपट रंगूनच्या सेटवर गेली होती. तेव्हा शाहीद एका कामामध्ये व्यस्त होता. रंगूनसाठी शाहीद कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धातील पुरुषांच्या गटांतील पिस्तुलाच्या नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रौनक पंडितकडून प्रशिक्षण घेतोय. रौनकही शाहीदचा वक्तशीरपणा आणि कामावरील निष्ठा पाहून खूश झाला आहे. तो प्रत्येकाकडे शाहीदची प्रशंसा करत सुटलाय. शाहीदचं नेमबाजीचं कौशल्य सर्वोत्तम असून ते त्याच्या रक्तातच असल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या या प्रशंसेमुळे भारावलेला शाहीद अजून जोमाने सराव करतोय.

मसक्कली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Glam gappa diya mirza shahid kapoor