गाणं, संगीत या गोष्टी अनेकांच्या मनाच्या जवळच्या. मनात होणारी घालमेल, त्रागा, राग- रुसवे आणि ताणतणाव या साऱ्यावर सुरेल फुंकर घालणारी बरीच गाणी आज अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत. त्यातही बॉलिवूड चित्रपट गीतांची जादू काही औरच. गाणी आणि पार्श्वसंगीत हा हिंदी चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याचदा तर चित्रपटातील संगीताच्या बळावर तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतो. अशी बरीच उदाहरणही आहेत. संगीतकार ओ. पी. नैय्यर, नौशाद, लक्ष्मीकांत- प्यारेलाल, शंकर जयकिशन यांनी विविध चित्रपटगीतांना असं काही संगीत दिलं आहे ज्याची भुरळ आजही प्रेक्षकांवर पाहायला मिळते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या १९५० ते १९७० या काळातील अशीच काही चित्रपट गीतं पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहेत. तीसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने. या सुरेल गाण्यांना साथ आहे ती ८०- ९० च्या दशकातील काही प्रसिद्ध गाण्यांची. ‘स्कूपव्हूप’ या वेबसाइटने त्यांच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर या सुरेख गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘स्कूपव्हूप कॅफे’ या संकल्पनेअंतर्गत दोन तरुणांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा हा सुरेल प्रवास सर्वांसमोर सादर केला आहे.

सध्या फेसबुकवर या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलं असून तरुणांमध्येही याविषयीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. रॅप आणि हिप- हॉप गाण्यांची चलती असताना बॉलिवूड संगीत त्याचं स्थान राखून आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अंकुर डोबरियाल आणि अक्षय नायर यांनी अतिशय सुरेख अंदाजात फक्त गिटारच्या साथीने ही गाणी सादर केली आहेत. ‘ये चाँद सा रोशल चेहरा’, ‘ए दिल मुझे बता दे’, ‘शोला जो भडके’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ या गाण्यांपासून थेट ‘कबीरा’पर्यंत हा सुरेल प्रवास अनेकांचीच मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे अवघ्या एक दोन ओळीची ही गाणी साडेसात- आठ मिनिटांत सादर केलेल्या व्हिडिओला तुम्हीदी नकळत साथ देता आणि शेवटी क्या बात अशीच दाद तुमच्या तोंडून निघून जाते.


(सौजन्य- स्कूपव्हूप/ फेसबुक)

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

हा व्हिडिओ पाहून अनेकांनीच दोन्ही कलाकारांचं कौतुक केलं असून ‘पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या’, ‘भारतीय संगीताला तोड नाही’, अशा कमेंट्सही केल्या आहेत.

VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?