गोविंदाच्या 'दुल्हे राजा' चित्रपटाच्या रिमेकबद्दल मोठा खुलासा; शाहरुख साकारणार मुख्य भूमिका? | govinda evergreen movie dulhe raja remake rights is sold will shahrukh khan play the lead role | Loksatta

गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’ चित्रपटाच्या रिमेकबद्दल मोठा खुलासा; शाहरुख साकारणार मुख्य भूमिका?

शाहरुख खान रोहित शेट्टीबरोबर गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटाच्या रिमेकवर काम करत असल्याच्या चर्चासुद्धा रंगत आहेत.

shahrukh khan dulhe raja remake
शाहरुख खान दुल्हे राजा रिमेक | shahrukh khan dulhe raja remake

८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूड चित्रपटांना उभारी देणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती, एकूणच हिंदी चित्रपटात तोचतोचपणा यायला लागला होता. अनिल कपूर सनी देओल, मिथुन चक्रवर्तीसारखे कलाकार जोमात होतेच, पण त्या काळात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन गोविंदाने केलं होतं. याच काळात गोविंदा, कादर खान आणि डेविड धवन हे त्रिकुट चित्रपटसृष्टीवर राज्य करत होतं. गोविंदा आणि कादर खान या जोडीने त्याकाळात बरेच हीट चित्रपट दिले. ‘हम’, ‘आग’, ‘हत्या’पासून ‘कुली नं १’, ‘हीरो नं १, ‘हसिना मान जायेगी’पर्यंत कित्येक चित्रपट लोकानी डोक्यावर घेतले.

त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘दुल्हे राजा’. या चित्रपटात गोविंदा, कादर खान, रवीना टंडन, मोहनिष बेहेल, जॉनी लिव्हर,सारखे कलाकार होते. नुकतंच या चित्रपटाच्या रिमेकचे आणि नेगेटिव्हचे हक्क शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेंमेंट’ने विकत घेतले असल्याची बातमी समोर आली आहे. शिवाय लेखक दिग्दर्शक फरहाद सामजी हे या चित्रपटाच्या लेखनाची जवाबदारी घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “मला त्याची अंतर्वस्त्रे… ” गोविंदाच्या बायकोने कपिल शर्माच्या कार्यक्रमात केला होता खुलासा

काही मीडिया रीपोर्ट आणि पिंकव्हीलाच्या माहितीनुसार या चित्रपटाच्या सॅटेलाइट हक्कावरूनसुद्धा चर्चा सुरू आहेत आणि ते हक्कसुद्धा रेड चिलीज स्वतः विकत घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या फरहाद सामजी हे सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. पण त्यांना या ‘दुल्हे राजा’च्या रिमेकसाठी नवीन आजच्या काळाला साजेशी अशी पटकथा लिहिण्यासाठी सुचवण्यात आलं असल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणासाठी अबू सालेमच्या सांगण्यावरून दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता

पटकथा लिहून झाल्यावर त्यानुसार या रिमेकमध्ये मोठ्या स्टारला घ्यायचं की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. याची पटकथा पसंत पडली तरच रेड चिलीज या रिमेकची निर्मिती करेल असंही म्हंटलं जात आहे.यामध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे, पण अजूनतरी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शाहरुख खान रोहित शेट्टीबरोबर गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटाच्या रिमेकवर काम करत असल्याच्या चर्चासुद्धा रंगत आहेत. शाहरुखचे ३ चित्रपट येत्या नवीन वर्षात चित्रपटगृहात झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-09-2022 at 12:17 IST
Next Story
Video : मध्यरात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली शहनाज गिल, व्हिडीओ व्हायरल झाला अन्…