धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘धर्मवीर’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात दाखल झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली त्यानिमित्ताने ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पडद्यामागील गोष्टी, आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी केलेली तयारी आणि अनेक नानाविध किस्से प्रसादने गप्पांमध्ये सांगितले.
लोकसत्ता प्रतिनिधी
‘‘आपल्या इंडस्ट्रीत उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. ‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’ हे चित्रपट फार जोरात चालतायत तेव्हा एक दिग्दर्शक म्हणून प्रसादचे फारच भले होते आहे, असा विचार केला जातो. दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करणारे फार कमी आहेत, पण मलाही कळतं यात खोटेपणा किती आणि सच्चेपणा किती आहे. इतकी वर्षे मी लोकांना अनुभवतोय. एक चित्रपट गाजला तेव्हा प्रसाद चांगलं काम करतोय असं नसतं. प्रसाद आधीपासून चांगलंच काम करतोय. नट हा उत्तमच असतो त्याच्यासाठी योग्य वेळ यावी लागते आणि माझी ही वेळ ‘धर्मवीर’च्या निमित्ताने आली आहे. आज दाक्षिणात्त्य चित्रपटांमध्येही खूप एकी आहे, पण आपल्याकडे ती नाही कारण एकमेकांचं भलं पाहणारी मंडळीच या इंडस्ट्रीत नाहीत’’, अशी खंत या वेळी अभिनेता प्रसाद ओक याने व्यक्त केली.
‘‘लोकांना वाटले असेल की मी अभिनय सोडून दिलाय कारण ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातही मी व्यस्त असल्याने ‘पिकासो’, ‘धुरळा’ आणि ‘स्माइल प्लीज’ या तीन चित्रपटांव्यतिरिक्त मी काहीच करू शकलो नव्हतो. पण ‘धर्मवीर’च्या निमित्ताने मला माझी अभिनयाची भूक भागवता आली, याचा आनंद आहे असे प्रसादने सांगितले.
प्रसादने हुबेहूब धर्मवीर आनंद दिघे साकारले असल्याने त्याला प्रेक्षकांची वाहवाही मिळते आहे. या भूमिकेसाठी प्रसादने किती मेहनत घेतली आहे याबद्दलही त्याच्याकडून जाणून घेता आले. ‘‘आनंद दिघे यांची भूमिका निभावताना नक्कीच दडपण आलं होतं, पण चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी इतकं छान सांभाळून घेतलं की काम करताना ते दडपण कमी होत गेलं. दुर्दैवाने मी धर्मवीर आनंद दिघे यांना कधी भेटलो नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेची तयारी करताना मी त्यांचे फोटो खूप पाहिले. निर्माते मंगेश देसाई आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीच मला त्यांचे आठशे ते एक हजार फोटो दाखवले. त्यांच्या चित्रफिती खूप कमी आहेत, पण ज्या उपलब्ध आहेत त्यातून त्यांचे निरीक्षण मी केले. खूप लोकं मला भेटली, त्यांनी मला दिघेसाहेबांबद्दल सांगितले. त्यांनी तर अक्षरश: दिघेसाहेबांचे व्यक्तिमत्त्व माझ्या डोळय़ासमोर उभे केले आणि तेव्हा कळले की लोक आजही त्यांच्याबद्दल किती भरभरून बोलतात, इतकं प्रेम ते दिघेसाहेबांवर आजही करतात. दिघेंच्या छायाचित्रांमधून त्यांची देहबोली जितकी समजून घ्यायची तितकी मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची चालण्याची, बोलण्याची पद्धत, ते ओठ, हात, पाय, बोट कसे हलवायचे. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे डोळे आहेत. त्यांची ती नजर आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला’’, अशी माहिती या वेळी प्रसादने दिली.
आनंद दिघे यांची भूमिका कशी मिळाली यावर बोलताना प्रसादने सविस्तरपणे सांगितले की, ‘‘निर्माते मंगेश देसाई यांनी मला ठाण्याला एका लुक टेस्टसाठी बोलावले. तेव्हा तिथे विद्याधर भट्टे होते ज्यांनी हा दिघे यांचा लुक तयार केला आहे. खरंतर मला अजिबातच कल्पना नव्हती ही लुक टेस्ट कशासाठी आहे. विद्याधर मला दाढी वगैरे लावत होते तेव्हा मला वाटलं की ऐतिहासिक भूमिका असावी. पण जेव्हा त्यांनी मला विग लावायला सुरुवात केली तेव्हा मंगेशने मला सांगितले की ही टेस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी आहे. त्या वेळी मी अक्षरक्ष: उडलोच. मग त्यानंतर इतरांच्या ज्या लुक टेस्ट झाल्या त्यात विद्याधर यांचे म्हणणे होते की मीच त्यात उजवा वाटतोय. माझ्या लुक टेस्टमध्येही काही त्रुटी होत्या. अगदी दातांपासून ते नाक आणि केसांचा रंग वगैरे.. यावरही आठवडाभर काम करून माझा लुक अंतिम झाला,’’ असे प्रसादने सांगितले. मंगेशचा मित्र शशिकांत जाधव तिथे त्याला भेटायला आला होता आणि योगायोगाने शशिकांत आनंद दिघे यांच्या सहवासातही बरेच वर्षे होता. शशिकांत तेथे डबा घेऊन आला होता आणि आनंद दिघेंच्या लुकमध्ये त्याने मला अचानक पाहिले आणि तो दोन फूट मागे गेला व ढसाढसा रडायला लागला. तेव्हा शशिकांतने मला बघून सांगितले की हे तर आनंद दिघे आहेत. मंगेश म्हणाला बस्स हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. शशिकांतला माहिती नसताना त्याने तुला आनंद दिघे म्हणून ओळखले. या प्रसंगाचा व्हिडीओ आणि मग लुकचा फोटो नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला तेव्हा त्यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‘‘मंगेश देसाई हा माझा पंधरा ते वीस वर्षे जुना मित्र आहे. तेव्हा तो पहिल्यांदाच निर्मिती करत असलेल्या चित्रपटात मी असणं ही एक चांगली बाब होती. प्रवीण तरडे हाही माझा पुण्यापासूनचा मित्र आहे त्यातून मी त्याच्या आग्रहापायी ‘देऊळ बंद’ या त्याच्या चित्रपटात छोटेखानी भूमिका केली होती आणि त्याने मला तेव्हा शब्द दिला होता की तू माझ्यासाठी यात छोटी भूमिका केलीस पुढल्या वेळी मी नक्की तुला मोठय़ा भूमिकेत घेईन आणि तो शब्द प्रवीणने या वेळी पाळला. तेव्हा या चित्रपटासाठी नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते’’, असेही या वेळी प्रसादने प्रामाणिकपणे कबूल केले.
प्रसादची आनंद दिघेंना विनवणी..
‘‘आनंद दिघे यांच्या डोळय़ात त्यांच्या भूमिकेचा आत्मा होता.
मी सतत त्यांच्या डोळय़ांचे निरीक्षण करायचो. एकदा त्यांच्या फोटोला धरून मी त्यांच्याकडे विनवणी केली, मला तुमचा आशीर्वाद तर हवाच आहे, पण मला तुमचे डोळे द्या पुढच्या
५५ दिवसांच्या चित्रीकरणासाठी..’’, अशी एक भावनिक आठवण या वेळी प्रसादने सांगितली. ‘‘दिघेसाहेबांचा जनसंपर्क अफाट होताच, परंतु त्यांच्या एका नजरेतून समोरच्या कार्यकर्त्यांला कळायचे की त्यांना काय संदेश कोणाला पोहोचवयाचा आहे त्यामुळे ही ताकद अफाट होती. त्यातून
त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत आणि हे मला त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,’’ अशी भावना प्रसादने व्यक्त केली.
मोठय़ा बॅनरशिवायही चित्रपट प्राइम टाइमसह चालतात..
‘धर्मवीर’ या चित्रपटामागे ‘झी स्टुडिओज’ असल्याने अर्थात त्यांची खूप मोठी यंत्रणा आहे. त्यामुळे प्राइम टाइमचा प्रश्न नाहीये, पण असेही नाही आहे की चित्रपटामागे बॅनर आहे म्हणून प्राइम टाइमला काही फरक पडेल. ‘हिरकणी’ म्हणा किंवा अगदी ‘देऊळ बंद’ आणि हल्लीचा ‘पावनिखड’ म्हणा त्यांच्यामागे कुठलाही मोठा बॅनर नव्हता पण चित्रपट तुफान चालले. ‘हिरकणी’च्या वेळेस चार मोठे हिंदी चित्रपट असतानाही त्यांना मागे टाकून तो चालला तेव्हा हेही लक्षात घेण्यासारखे आहे,’’ असं मत प्रसादने व्यक्त केलं.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट