करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना अनेक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अलिकडेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडिया’ला ५० लाख रुपयांची मदत केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी आता  १ हजार गरजू कलाकारांना किराणा सामान पुरविण्याचं निर्णय घेतला आहे.

‘इंडिया टुडे’नुसार, लॉकडाउनमुळे सध्या कलाविश्वातील पूर्ण कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक ज्युनिअर आर्टिस्ट, रोजंदारीवर काम करणारे मजूर यांना आर्थिक तसंच दैनंदिन समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन (नदीगर संगम) अंतर्गंत येणाऱ्या १ हजार कलाकारांना किराणा सामान पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

रजनीकांत पुरविणार असलेल्या किराणा सामानात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जवळपास सगळ्या वस्तूंचा समावेश असेल. खासकरुन भाज्या, तांदूळ, दूध या सारख्या वस्तूंचा त्यात समावेश असणार आहे.

दरम्यान, लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांना संकटांचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वातील अनेक कलाकार एकत्र येऊन अशा गरजूंना मदत करत आहेत. आतापर्यंत दाक्षिणात्य कलाविश्वातील चिरंजीवी, महेशबाबू यासारख्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.