सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. आता बॉलिवूडमधील अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. दिग्दर्शक करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाती तारीक समोर आली आहे.

जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीक सांगितली आहे. ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे’ असे तिने म्हटले आहे.

कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.