प्रसिद्ध फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा गुप्ताचा एक्स पती आणि चित्रपट निर्माता मधू मंटेना बाबा झाला आहे. त्याची पत्नी इरा त्रिवेदीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मधू मंटेनाने स्वतः इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
५१ वर्षांचा मधू मंटेना व इरा त्रिवेदी यांच्या घरी एका चिमुकल्या सदस्याचे आगमन झाले आहे. मधू मंटेना आणि इरा त्रिवेदी यांना मुलगा झाला आहे. या बातमीमुळे मंटेना आणि त्रिवेदी कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मधू मंटेनाने जून २०२३ मध्ये योगा टीचर व लेखिका इरा त्रिवेदीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या अडीच वर्षांनंतर त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.
पाहा मधू मंटेनाची पोस्ट
“कृष्णा, या दैवी आशीर्वादासाठी आणि आमचे आयुष्य प्रेमाने भरल्याबद्दल तुझे खूप आभार.
नवरात्रीच्या पवित्र दिवसांत आणि ईदच्या दिवशी, मी आणि इराने आमच्या बाळाचे स्वागत केले,” असं कॅप्शन देत मधू मंटेनाने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये बाळाचं पाऊल दिसंतय, तसेच कृष्णाचा एक फोटोदेखील आहे.
मधू मंटेनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. राजकुमार राव, रवीना टंडन, सिमोन खंबाटा, पुलकित सम्राटसह अनेकांनी कमेंट्स करून मधू व इरा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मधू मंटेना व मसाबा गुप्ता यांचे लग्न व घटस्फोट
चित्रपट निर्माता मधू मंटेना आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोगांनी २ जून २०१५ रोजी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर, २०१८ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं की ते एकमेकांपासून काही काळ दूर राहणार आहेत. थोडे दिवस वेगळे राहून ते आपल्या नात्याबद्दल विचार करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. पण नंतर ते पुन्हा एकत्र आले नाहीत. त्यांनी घटस्फोट घेतला. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट अधिकृतपणे मंजूर झाला आणि ते कायदेशीररित्या वेगळे झाले.
मसाबा गुप्ताचे दुसरे लग्न
मसाबाने २०२३ मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्याशी लग्न केले. मसाबा २०२४ मध्ये आई झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तर ‘गजनी’ चित्रपटाचा निर्माता मधू मंटेनाने जून २०२३ मध्ये इरा त्रिवेदीशी लग्न केलं आणि आता त्यांना मुलगा झाला आहे.
